‘जयंती’ ओव्हर फ्लो
By Admin | Updated: November 18, 2015 00:13 IST2015-11-17T23:47:10+5:302015-11-18T00:13:42+5:30
‘प्रजासत्ताक’ची तक्रार : प्रदूषण मंडळ, महापालिकेकडून पाहणी

‘जयंती’ ओव्हर फ्लो
कोल्हापूर : जयंती नाला ओसंडून वाहून विनाप्रक्रिया सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याची तक्रार कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मंगळवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कोल्हापूर कार्यालयाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी व महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जयंती नाल्याची पाहणी केली.
मंगळवारी दुपारी अचानक दिलीप देसाई, संस्थेचे सचिव बुरहान नायकवडी यांनी जयंती नाल्याची पाहणी केली. यावेळी हा नाला ओसंडून वाहून त्यातून विनाप्रक्रिया सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात मिसळत असल्याचे पाहिले. त्यानंतर देसाई यांनी दूरध्वनीद्वारे राजेश आवटी व आर. के.पाटील यांना सांगितले. त्यानुसार पाटील व आवटी यांनी तत्काळ जयंती नाला येथे भेट देऊन नाल्याची पाहणी केली.यावेळी जयंती नाल्यामध्ये पूर्णत: लाकडी बरगे घातले नसल्याचे, तसेच पंचगंगा पंपिंग स्टेशनमधील दोन्ही पंप चालू असून सांडपाणी उचलून नवीन ७६ एमएलडीला जात असल्याचे दिसून आले. यावेळी जयंती नाल्यावरील बरग्यांपैकी तीन बरग्यांवरून तसेच बाजूने लालसर रंगाचे फेसाळ सांडपाणी विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत जात होते. त्याचबरोबर यावेळी ओसंडून जात असलेल्या सांडपाण्याचा नमुना उपस्थितांसमोर संकलित करण्यात आला. यावेळी करवीर विभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.