जावीरचा आंतरराज्य टोळीचा प्रयत्न उधळला
By Admin | Updated: April 4, 2015 00:29 IST2015-04-04T00:22:51+5:302015-04-04T00:29:07+5:30
दहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी : आणखी एका साथीदाराचा शोध सुरू

जावीरचा आंतरराज्य टोळीचा प्रयत्न उधळला
कोल्हापूर : पन्हाळा येथून पोलिसांच्या हाताला हिसडा मारून व चटणी डोळ्यांत फेकून बेड्यासह पसार झालेला इचलकरंजीतील कुविख्यात गुंड संशयित बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (वय ३२ रा. कारंडे मळा, शहापूर) याच्यासह त्याच्या तीन साथीदार आंतरराज्य टोळी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी हैदराबाद येथे जाऊन त्याठिकाणी दरोडा टाकण्याचा या सर्वांचा कट त्यांनी रचला होता,अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे पण,जावीरसह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, अटक केलेल्या जावीरसह साथीदार संशयित अंकुश भगवान गरड (वय २४ रा. श्रीकृष्णनगर,तारदाळ), पिंटू उर्फ धनाजी पांडुरंंग जाधव (२४ कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी) यांना शुक्रवारी पन्हाळा येथील न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.
पन्हाळा येथे आठ डिसेंबर २०१४ ला न्यायालयात नेत असताना पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून व हाताला हिसडा मारून पोलिसांवर हल्ला करून बबलू उर्फ विजय जावीरची त्याच्या दोन साथीदारांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर हे तिघेजण दुचाकीवरून पसार झाले होते. जावीरला कोतोली येथील एका गुन्ह्णाप्रकरणी पोलीस पन्हाळा न्यायालयात हजर करत होते. इचलकरंजी येथील खूनप्रकरणी तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात होता. जावीरच्या अपहरणाचा कट त्याच्या एका साथीदाराने रचला होता. पन्हाळा येथून पसार झाल्यानंतर ते येथून मिरज येथे गेले. त्याठिकाणी रेल्वेतून ते दौंड (जि. पुणे) येथे गेले . त्याठिकाणी तिघांनी पंधरा दिवस वास्तव्य केले. त्यानंतर ते रेल्वेने परभणीमार्गे नांदेडला गेले. तीन महिने नांदेडमध्ये एका खोलीत राहिले. घरमालकाला आपण महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी याठिकाणी आलो आहे. आपण विद्यार्थी आहे, असे त्यांनी सांगितल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे.
साडेतीन महिन्यांपासून या तिघांचा पोलीस शोध घेत होते. कोल्हापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्याच्या मागावर होते. संशयित गरड व जाधव हे जावीरला नांदेडला ठेवून ते नातेवाईकांच्या मोबाईलवरून संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कोल्हापुरातूनच गरड व जाधव याचा पाठलाग सुरू केला. अखेर नांदेड येथे पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी त्यांना कोल्हापुरात आणले. जावीरच्या अपहरणाचा कट रचण्याऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. सहाय्यक निरीक्षक विकास जाधव अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)