जत तालुक्यात द्राक्ष छाटण्या रखडल्या
By Admin | Updated: November 11, 2016 00:05 IST2016-11-10T23:52:17+5:302016-11-11T00:05:12+5:30
उत्पादन घटणार : पावसाने पाठ फिरविल्याने पाणीप्रश्न गंभीर; शेतकरी कर्जबाजारी

जत तालुक्यात द्राक्ष छाटण्या रखडल्या
गजानन पाटील -- संख -कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडले आहेत. पूर्व भागातील आॅक्टोबर महिन्यातील ५० टक्के छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. यावर्षी द्राक्ष छाटणीच होणार नसल्याने द्राक्ष उत्पादनात घट होणार आहे. उत्पादनच होणार नसल्याने द्राक्ष बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार?, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत, तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत बागा फुलविल्या आहेत. ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा जोपासल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.
शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी द्राक्षजातीच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, तिकोंडी, भिवर्गी, सिध्दनाथ, अंकलगी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, कोंत्यावबोबलाद आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने यावर्षी होणारी छाटणी झाली नाही. पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. कूपनलिका खोदली तरीसुध्दा पाणी लागत नाही. त्यामुळे बागा पुढे जगवायच्या कशा? हा प्रश्न आ वासून उभा आहे. यावर्षी तालुक्यामध्ये ५० टक्के बागांचीच आॅक्टोबर छाटणी झालेली आहे. जानेवारी महिन्यापासून बागांना पाणी मिळणे मुश्कील होणार असल्याने द्राक्षबागा वाळणार आहेत. बागा काढून टाकल्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांनी बागांवर काढलेल्या सोसायटी, बँकेच्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.
बेदाणा : मार्केटिंगकडे कल
पाण्याअभावी द्राक्षबागांची छाटणी झाली नसल्याने व गेल्या दोन वर्षापासून बेदाण्याला दर मिळत नसल्यामुळे यावर्षी शेतकरी बेदाणा तयार करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. मार्केटिंग करण्याकडे त्याचा कल आहे. परिणामी बेदाणा निर्मितीमुळे मजुरांना काम मिळत होते, ते कमी होणार आहे.
खरड छाटणीच झाली नाही
गेल्या दोन वर्षापासून पूर्व भागातील माडग्याळ, सोन्याळ, उटगी, उमदी, संख परिसरात पाऊस कमी झालेला आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे या भागातील ३० टक्के द्राक्षबागांची पाण्याअभावी उन्हाळ्यात खरड छाटणीच झालेली नाही.