पोटनिवडणूक लढविण्याचा जारकीहोळींचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:51+5:302021-03-27T04:25:51+5:30
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेशपत्र आज प्रसिद्धीस देण्यात आले आहे. ...

पोटनिवडणूक लढविण्याचा जारकीहोळींचा निर्धार
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेशपत्र आज प्रसिद्धीस देण्यात आले आहे. यानंतर बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत आपण लोकसभा पोटनिवडणूक लढवून जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला. येत्या सोमवारी आचारसंहिता आणि कोविड सरकारी मार्गसूचीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी (दि. २९ मार्च) केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एस. आर. पाटील यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी रविवारी सायंकाळी ६.३0 वाजता केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार बेळगाव येथे दाखल होतील. अशी माहिती जारकीहोळींनी दिली. भारतीय जनता पक्षाने गुरुवारी दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी बंगळूर येथे सिद्धरामय्या यांनी सतीश जारकीहोळी बेळगाव पोटनिवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. शुक्रवारी एआयसीसीतर्फे अधिकृत आदेशपत्र प्रसिद्धीस देण्यात आले असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सतीश जारकीहोळींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश जारकीहोळी हे २०२३ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सतीश जारकीहोळी उतरणार आहेत.