जानू मास्तरांनी केला यष्टिरक्षकाचा गोलरक्षक

By Admin | Updated: December 10, 2014 00:15 IST2014-12-10T00:13:54+5:302014-12-10T00:15:28+5:30

-कोल्हापूरचा फुटबॉल...

Janu Master made the keeper of the wicketkeeper | जानू मास्तरांनी केला यष्टिरक्षकाचा गोलरक्षक

जानू मास्तरांनी केला यष्टिरक्षकाचा गोलरक्षक

एकोणीशे बासष्ट साली मी ना. पा. हायस्कूलमध्ये नववीत शिकत होतो. त्याकाळी फुटबॉलबरोबर क्रिकेटचीही मोठी क्रेझ होती. मलाही साहजिक क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. त्याकाळी शिवाजी स्टेडियममध्ये दिवसभर क्रिकेटचे सामने होत असत. तेथेच सायंकाळी सरावही होत असे, या सरावादरम्यान मी यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडीत असे, तेथे हे सर्व पाहणारे जानू मास्तर होते. त्यांचे लक्ष माझ्याकडेही गेले आणि त्यांनी मला शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक केले. पाटाकडील तालीम संघाचे ज्येष्ठ फुटबॉलपटू व शिवाजी विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव बाळासाहेब निचिते यांनी आपला फुटबॉलचा प्रवास उघड केला.
जानू मास्तरांच्या आग्रहामुळे मी ‘शिवाजी’चा गोलरक्षक झालो खरा, परंतु मी ‘शिवाजी’कडून एकच सामना खेळलो. या सामन्यानंतर ‘बालगोपाल’चे नियमित गोलरक्षक बबन थोरात यांना एसटीत नोकरी लागल्याने बालगोपालला चांगल्या गोलरक्षकाची उणीव भासू लागली. अनेक ज्येष्ठांनी माझे गोलरक्षण पाहिले होते. माझा खेळ बघून पिसे, मगदूम यांनी गोलरक्षक म्हणून संघात घेतले. बालगोपालकडून अनेक सामने खेळल्यानंतर पाटाकडील तालमीच्या संघाची स्थापना झाली. मग या संघाकडून मी खेळू लागलो. याचदरम्यान मी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. माझी राजारामकडून विद्यापीठ फुटबॉल संघात निवड झाली. माझ्याबरोबर गोखले कॉलेजचे रघु पिसे, अरुण नरके, बाळ जाधव, पंडित गुजर, मोहन माने, कृष्णात मंडलिक, उमेश चोरगे हे या संघात होते. निवड समितीवर क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर होते. विद्यापीठाचा पहिलाच फुटबॉल संघ असल्याने विद्यापीठाचा पहिला गोलरक्षक होण्याचा मानही मला मिळाला. पहिल्याच सामन्यात आम्ही मुंबई संघाचा पराभव केला. त्यामुळे हा सामना माझ्या आयुष्यात वेगळा टर्न देऊन गेला. मी बी.ए. चा शेवटचा पेपर लिहिताना मला विद्यापीठात लिपिक भरती असल्याचे समजले. मी तेथून अर्ज करून विद्यापीठात दिला.
त्यानंतर मी १९८३ पर्यंत केवळ ‘पिवळा-निळा’ अर्थात पाटाकडील तालीमचे प्रतिनिधित्व केले. आताची पिढी गुणात्मक खेळ करीत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी खेळाचा वापर करतात. त्यामुळे ही मानसिकता बदलली नाही तर कोल्हापुरी फुटबॉल केवळ कोल्हापूर पुरताच राहील.
- शब्दांकन : सचिन भोसले


लोकाश्रय आणि राजाश्रय लाभलेला आणि शतकोत्तरी परंपरा असलेला कोल्हापुरी फुटबॉल पेठेच्या परिघातून आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचला आहे. अनेक दिग्गज खेळाडू हे या समृद्ध परंपरेचे पाईक आहेत. ज्यांच्या कर्तृत्वाने आणि कर्तव्याने या परंपरेला सुवर्णपंख लाभले, त्यांच्याविषयी जाणून घेऊया या मालिकेतून...

Web Title: Janu Master made the keeper of the wicketkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.