खताच्या दरवाढीविरोधात जनसुराज्य रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:45+5:302021-05-20T04:25:45+5:30
केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...

खताच्या दरवाढीविरोधात जनसुराज्य रस्त्यावर उतरणार
केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षांत शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उद्योगधंदे कोलमडले आहेत, नोकर भरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड महागाई वाढत आहे.
यात जनता, शेतकरी, तरुण वर्ग होरपळत असताना केंद्र सरकार ३७० कलम रद्द केले, पुलवामा स्ट्राइक, राममंदिर अशा प्रश्नांकडे लक्ष वेधून देशातील जनतेच्या रोजीरोटीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेत असंतोष पसरला आहे, असे विजयसिंह जाधव यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती कमी असताना देखील सहा वर्षांत पेट्रोल, डिझेलच्या किमतीत आजपर्यंत पंचवीस रु.पर्यंत वाढ झाली. तेलाच्या किमतीच्या तुलनेत जीवनावशक वस्तूंचे दर किती वाढले, खतांचे दर तर पाचशे ते हजार रु.पर्यंत वाढले. शेतकऱ्यांच्या शेती मालाचा भाव व जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायाचा उत्पादकांना मिळणाऱ्या दरात पाच-सहा वर्षांत कोणतीच अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्राच्या धोरणाने सामान्य माणूस व शेतकरी, मजूर, बेरोजगार भरडला जात असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या खत दरवाढीविरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे विजयसिंह जाधव यांनी सांगितले.