जयसिंगपूरच्या नगरसेवकास फसवणूकप्रकरणी अटक
By Admin | Updated: August 7, 2015 00:28 IST2015-08-07T00:28:41+5:302015-08-07T00:28:53+5:30
आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.

जयसिंगपूरच्या नगरसेवकास फसवणूकप्रकरणी अटक
पुणे/जयसिंगपूर : जंगली औषधांच्या साहाय्याने आजार बरा करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. दुर्गाप्पा जंगप्पा वैदु (वय ३९, रा. शिवसाई प्रसाद इमारत, किनारा हॉटेलमागे, कात्रज) असे आरोपीचे नाव असून तो जयसिंगपूरचा नगरसेवक असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिली. त्याच्याकडून पावडर आणि झाडांच्या मुळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दुर्गाप्पा हा जयसिंगपूर नगरपालिकेच्या प्रभाग ४ मधून निवडून आलेला आहे. पुणे पोलीस कर्मचारी रमेश भोसले यांना खबऱ्यामार्फत दुर्गाप्पा बाबत माहिती मिळाली होती. जंगली औषधांच्या साहाय्याने आजार बरा करण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांना गंडा घातलेला आहे. अशाच एका गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी औंध येथील आयटीआयजवळ सापळा लावण्यात आला. एका ताडपत्रीच्या पिशवीमध्ये औषधांची विक्री करण्यासाठी आलेल्या दुर्गाप्पाला पोलिसांनी पकडले. त्याने साथीदारांच्या मदतीने चतु:श्रुंगी भागात औषधांचे दुकान थाटले होते. आठ महिन्यांपुर्वी एका महिलेसह दोघाजणांना औषधे देण्याच्या आमिषाने तीन लाख रुपयांना फसवले होते. या दोघांनी पैशांचा तगादा लावल्यावर आरोपी दुकान बंद करुन पसार झाले होते. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त एच. सी. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे, सहायक फौजदार रविंद्र कदम, रमेश भोसले, रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, तुषार खडके, प्रविण शिंदे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, सुभाष पिंगळे, सुधीर माने यांनी केली. आरोपीला चतु:श्रुंगी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.