विश्वकल्याणासाठी जैन धर्म नेहमीच अग्रेसर

By Admin | Updated: April 9, 2016 00:09 IST2016-04-08T23:53:42+5:302016-04-09T00:09:30+5:30

विश्वरत्नसागर महाराज : कोल्हापुरात विशेष मांगलिक प्रवचन

Jainism is always ahead for world peace | विश्वकल्याणासाठी जैन धर्म नेहमीच अग्रेसर

विश्वकल्याणासाठी जैन धर्म नेहमीच अग्रेसर

कोल्हापूर : अहिंसा व शांतीचा संदेश देणारा जैन धर्म नेहमीच विश्वकल्याणासाठी अग्रेसर राहिला आहे, असे प्रतिपादन आचार्य विश्वरत्नसागर महाराज यांनी केले.आशापूरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे शुक्रवारी येथील शुभंकरोती हॉल येथे विशेष मांगलिक प्रवचनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते पार्श्वनाथांचे प्रतिमापूजन झाले.आचार्य म्हणाले, भगवान महावीर यांनी २४०० वर्षांपूर्वी दिलेले उपदेश, संदेश आजच्या परिस्थितीत काळाची गरज बनले आहेत. कोणत्याही निर्मितीसाठी समर्पणाची भावना लागते. कल्याणाचा मार्ग समर्पणातच दडलेला असतो. तो समर्पणभाव जपला तर विश्वात शांती प्रस्थापित होईल. ज्यांच्या हृदयात शुद्ध प्रेम तसेच करुणा आहे, तेच आंतरिक स्वर्गीय सुखाचा अनुभव करू शकतात हा निसर्गनियम आहे. आपल्या आत्म्याप्रती असणारा भाव सर्व प्राणिमात्रांविषयी असू द्या.
चेन्नई येथील चातुर्मास पूर्ण करून ११५० किलोमीटरचा पायी प्रवास करून आचार्य महाराज त्यांच्या शिष्यासह गुढीपाडव्यादिवशी प्रवचनासाठी कोल्हापूरला आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक मंत्रपठण झाले.
दरम्यान, जिरावला पार्श्वनाथ जैन ट्रस्ट मंडळातर्फे राजस्थानातील सिराही येथे ९ फेबु्रवारी २०१७ ला होणाऱ्या मंदिर उद्घाटनाचे ‘श्री संघ शाही अग्रीम निमंत्रण’ भाविकांना दिले. यावेळी मुंबई येथील गायक विनीत गेमावत यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार ‘गोगी’ला भेटण्यासाठी मुलांची झुंबड उडाली होती.
यावेळी संभवनाथ मंदिराचे नरेंद्र ओसवाल, आशापूरण पार्श्वनाथ मंदिराचे ललित गांधी, वासूपूज्य स्वामी मंदिराचे सुरेश राठोड, मुनिसुव्रत मंदिराचे कांतीलाल ओसवाल, अमर गांधी, जयेश ओसवाल, बिपीन परमार, जिरावला मंदिर ट्रस्ट राजस्थानचे रमेश मुथा, प्रकाश शहा, ललित संघवी, अभय गांधी, आदींसह परिसरातील जैन बांधव उपस्थित होते. दीपक ओसवाल यांनी सूत्रसंचलन केले. प्रवचनासाठी विटा, कऱ्हाड, इचलकरंजीसह चेन्नई, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील जैन बांधव आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jainism is always ahead for world peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.