जयदीपला राष्ट्रीय शिबिरात सुवर्ण पदक
By Admin | Updated: July 18, 2015 00:14 IST2015-07-17T22:19:14+5:302015-07-18T00:14:03+5:30
पंजाब येथे सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या जयदीप परांजपे याला ब्रिगेडियर विजय यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जयदीपला राष्ट्रीय शिबिरात सुवर्ण पदक
रत्नागिरी : येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असलेला जयदीप रामचंद्र परांजपे हा पंजाब येथे झालेल्या एन. सी. सी.च्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाला होता. विविध उपक्रमात भाग घेतल्याने तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.२ ते १३ जुलै या कालावधीत अमृतसर (पंजाब) येथे एनसीसीचे राष्ट्रीय शिबिर झाले. यात जयदीप याच्याबरोबरच विवेक जुवळे आणि प्रसाद पाचकुडे या दोन विद्यार्थ्यांचा समावेश होता. या शिबिरात २३ राज्यांचा सहभाग होता. कोकणातून या तिघांची निवड झाली होती. या कालावधीत गायन, नृत्य, आदी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रस्सीखेच, रनिंग, रिले, फायरिंग या विविध उपक्रमांचा समावेश होता. यात गायनात वैयक्तिक स्तरावर भाग घेत जयदीप याने सुवर्णपदक मिळविले तसेच जयदीप याचा सहभाग असलेल्या समूह नृत्यालाही सुवर्णपदक मिळाले. या तिघांबरोबरच उर्वरित जिल्ह्यातील १३ जणांचा समावेश होता.
त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या २० मिनिटांच्या कार्यक्रमाचेही उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. एनसीसीचे शिक्षक, गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे शिक्षक तसेच प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे जयदीप याने सांगितले. जयदीप याने केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरात अभिनंदन होत आहे. जयदीप उत्कृष्ट तबलापटू, आॅक्टोपॅड वादक आहे. तसेच बुद्धिबळ, व्हॉलिबॉलपटू आहे. त्याला गायनाचा छंद आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
पंजाब येथे सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या जयदीप परांजपे याला ब्रिगेडियर विजय यांच्या हस्ते गौरविण्यात आले.