जयसिंगपुरात पदवी प्रवेशाचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: July 10, 2015 00:01 IST2015-07-10T00:01:51+5:302015-07-10T00:01:51+5:30

जादा तुकडीची गरज : विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

Jai Singhpuri degree question entry serious | जयसिंगपुरात पदवी प्रवेशाचा प्रश्न गंभीर

जयसिंगपुरात पदवी प्रवेशाचा प्रश्न गंभीर

जयसिंगपूर : पदवीच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशाचा प्रश्न जयसिंगपुरातही ऐरणीवर आला आहे. अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांच्या पहिल्या वर्षाचा प्रवेश प्रश्न गंभीर बनला असून, जयसिंगपूर महाविद्यालयाने बी.एस्सी.च्या जादा तुकडीबरोबरच बी.ए., बी.कॉम.साठी जादा जागांच्या मंजुरीचा प्रस्ताव विद्यापीठाला पाठविला आहे. बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जयसिंगपूर परिसरात एकमेव पदवीचे महाविद्यालय असून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे अर्ज दाखल केल्यानंतर गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. मात्र, जागेपेक्षा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. बी.एस्सी. भाग एकसाठी २४० जागा असून, जागांपेक्षा दुप्पट प्रवेश अर्ज दाखल झाल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी मोजकेच विषय असून, या परिसरातील विद्यार्थी दूरशिक्षण विभागाचा लाभ घेत आहेत. शेजारी असणाऱ्या सांगली व इचलकरंजी शहरांतील महाविद्यालयांतही हीच परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ‘ना घरका, ना घाटका’ अशी अवस्था बनली आहे. कुरुंदवाड येथेही कला, वाणिज्य व विज्ञानच्या शाखा असून, गेल्या वर्षीपासून विज्ञानाची नव्याने शाखा सुरू झाली आहे. मात्र, तेथेही प्रवेशाचा प्रश्न गंभीर आहे. (प्रतिनिधी)


प्रस्ताव विद्यापीठाकडे
सध्या शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कलही वाढतो आहे. त्यामुळे नव्या महाविद्यालयांना किंवा तुकड्या वाढविण्यास बंदी घातली जाणार नाही, अशी माहिती उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतीच कोल्हापूर येथे दिली होती. त्यानुसार जयसिंगपूर महाविद्यालयानेही बी.एस्सी. भाग एकसाठी वाढीव एक जादा तुकडी आणि बी.ए., बी.कॉम. भाग एकसाठी वाढीव जागा मंजुरीसाठी प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविला आहे. येथे नियमानुसारच प्रवेश सुरू झाले आहेत, अशी माहिती जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गांधी यांनी दिली.

Web Title: Jai Singhpuri degree question entry serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.