जयसिंगपुरात जिल्हा बॅँक शाखेला टाळे
By Admin | Updated: June 30, 2015 00:25 IST2015-06-29T23:52:30+5:302015-06-30T00:25:01+5:30
‘स्वाभिमानी’ची निदर्शने : ५ टक्के ठेव कपाती विरोधात संघटना आक्रमक

जयसिंगपुरात जिल्हा बॅँक शाखेला टाळे
जयसिंगपूर : शेतकऱ्यांच्या कर्जातून बॅँकेने ५ टक्के ठेव कपात करू नयेत. या मागणीप्रश्नी येथील जिल्हा बॅँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र निदर्शने करून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय त्वरीत स्थगित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
शेतकऱ्यातून कर्जातून बॅँकेने चालू वर्षापासून ५ टक्के ठेव कपात करण्यास सुरूवात केली आहे. सेवा संस्थांकडून ही भागभांडवल पैकी ५ टक्के कपात करण्यात येते. एकूण दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांला कमी मिळणार आहे. त्यामुळे या धोरणाचा जिल्हा बॅँकेने फेरविचार करावा. जिल्हा बॅँकेचे धोरण चुकीचे व शेतकरी विरोधी आहे, असा इशारा देत आज, सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅँकेचे विभागीय अधिकारी जगनाडे यांना धारेवर धरले. त्यानंतर शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.
आंदोलनात जि.प.सदस्य सावकर मादनाईक, प.स.सभापती शिला पाटील, उपसभापती वसंत हजारे, माजी जि.प.सदस्य प्रकाश परीट, प.स.सदस्या सुवर्णा अपराज, अनिता माने, युनूस पटेल, अदिनाथ हेमगिरे, आण्णासो चौगुले, बाळगोंडा पाटील, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, शैलेश आडके, सागर मादनाईक, बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, राजू नरदे, कार्यकर्ते सहभागी झाले होते.