पाणी अन् धंद्यासाठीच चालतो ‘जय महाराष्ट्र’
By Admin | Updated: May 26, 2017 22:59 IST2017-05-26T22:59:18+5:302017-05-26T22:59:18+5:30
पाणी अन् धंद्यासाठीच चालतो ‘जय महाराष्ट्र’

पाणी अन् धंद्यासाठीच चालतो ‘जय महाराष्ट्र’
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कर्नाटक शासनाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी घातल्याने मराठी माणसांमध्ये संतापाची लाट उसळली. शेजारधर्म म्हणून मराठी मातीनं नेहमीच मदतीचा हात दिला. दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या कर्नाटकसाठी कोयना धरणातून पाणी दिले. महाराष्ट्रातून रोज धावत असलेल्या शेकडो गाड्या लाखोंचा गल्ला भरुन नेताना त्यांना ‘जय महाराष्ट्र’ कसा चालतो,असा प्रश्न उपस्थित होतो.
मराठी माणसांविषयी कर्नाटक शासनाने नेहमीच राजकारण केले आहे. अधूनमधून त्यांचं पित्त उसळतं अन् मराठी माणसांची गळचेपी करणारे निर्णय घेतले जातात. सीमावर्ती भागात तर अमानुष अत्याचार केले जात आहेत. आता तर ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावरच बंदी घालण्यात आली. ही बंदी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्लाच आहे. त्यामुळे साहजिकच मराठी माणसांमधून विरोध केला जात आहे.
कर्नाटक शासनाला मराठी माणसांची, मराठी भाषेची एवढीच अॅलर्जी असेल तर त्यांच्या मतावर ठामतरी राहायला हवे. सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज धावताना पाहायला मिळतात. या महामंडळाने महाराष्ट्रातील एकही मोठे शहर सोडलेले नाही. काही ठिकाणी तर दिवसाला चार-पाच गाड्या सोडल्या आहेत.
महाराष्ट्रातील रस्त्यावर धावत असताना प्रवासी वाहतूक करुन लाखो रुपयांचा गल्ला घेऊन जात असल्याचे डोळ्यावर येऊ नये म्हणून त्यांनी शकल लढविली आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात येतात. कोल्हापूर बसस्थानकात थांबा घेतल्यानंतर काही गाड्या साताऱ्यात थांबा घेतात. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या कर्नाटक आगाराच्या गाड्यांची संख्या तीसच्या घरात आहे.
काही गाड्या कऱ्हाड बसस्थानकात थांबा घेऊन त्या पुण्याला जातात. या गाड्या सातारा शहरात न येता महामार्गावरुन मार्गस्थ होतात. यातील बहुतांश गाड्या लांब पल्ल्याच्या असल्याने दररोजचा लाखोंची कमाई करुन ते कर्नाटकात जातात. मराठी माणसांबद्दल एवढाच तिटकारा असेल तर महाराष्ट्रात येऊन धंदा करणे कसे चालते, असा प्रश्न विचारला जात आहे.
तिच अवस्था पाण्याबाबत आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात उगम पावणाऱ्या नदीवर बांधलेल्या कोयना धरणाचे पाणी गेल्या आठवड्यातच कर्नाटकला दिले. पण स्वाभीमान गहान ठेवलेल्या कर्नाटकाने एका हातात पाणी घेतले. तर दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र घोषणेवर बंदी घातली. यामुळे कर्नाटकच्या दुटप्पी धोरणाचा बुरखा पाटला आहे.
सीमावर्ती भागातील वाहकांवर जबाबदारी
कर्नाटकातून महाराष्ट्रातील सर्वच भागात धावत असलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये प्रवाशांची भाषा समजावी. वादाचे प्रसंग उद्भवू नयेत म्हणून सीमावर्ती भागातील ज्यांना मराठी अन् कन्नड अशा दोन्ही भाषा अवगत असलेल्या वाहकांना पाठविले जाते. त्यामुळे अनेकदा ते मराठीत बोलताना दिसतात.
येथे धावताहेत गाड्या
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या गाड्या प्रामुख्याने कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, शिर्डी या भागात धावतात. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच गाड्या धावतात. त्या प्रामुख्याने बेळगाव, विजापूर, बेंगलोर अन् हुबळी येथे जाते.
नोकरीसुद्धा महाराष्ट्रात
महाराष्ट्रातील रस्त्यावरुन कर्नाटक परिवहन महामंडळाच्या गाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा धावतात, याचा खोलात जाऊन विचार केला असता महत्त्वाची बाब लक्षात आली. कर्नाटकातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी पाहता बेंगलोरचा अपवाद वगळता कोणत्याही मोठ्या शहरात नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथील तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे स्थायीक झाले आहेत. त्यामुळे या भागात कर्नाटक गाड्या धावतात अन् चालतातही.
नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या कन्नड तरुणांना कधीच सवतीची वागणूक दिली नाही. ती मराठी मातीची संस्कृतीही नाही.