विद्यापीठात वाचनसंस्कृतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 01:13 IST2016-02-27T01:13:04+5:302016-02-27T01:13:04+5:30

ग्रंथ महोत्सवाला प्रारंभ : अंध विद्यार्थ्यांनी घडविली सुरेल सफर

The Jagar of Reading Studies at the University | विद्यापीठात वाचनसंस्कृतीचा जागर

विद्यापीठात वाचनसंस्कृतीचा जागर

कोल्हापूर : दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने वाचनसंस्कृतीला बळ देण्यासह तिच्या जागराचा उपक्रम शिवाजी विद्यापीठ दरवर्षी राबविते. त्यानुसार यावर्षीच्या ग्रंथ महोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. लोककला केंद्रासमोरील परिसरात महोत्सव भरविण्यात आला आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर अंध विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या कार्यक्रमातून उपस्थितांना सुरेल सफर घडविली.
सकाळी दहा वाजता कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. डी. बी. सुतार, पी. बी. बिलावर, अनिता शिंदे आदी उपस्थित होते. महोत्सवात राज्यातील विविध ५५ पुस्तक प्रकाशक सहभागी झाले आहेत. त्यांनी क्रमिक पुस्तकांसह विविध स्वरूपातील हजारो पुस्तके सादर केली आहेत. महोत्सव रविवारी (दि. २८)पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत खुला राहणार आहे. दरम्यान, महोत्सवाच्या उद्घाटनानंतर लोककला केंद्रात राष्ट्रीय अंध संघटनेतर्फे अंध विद्यार्थ्यांचा ‘आॅर्केस्ट्रा आयडियल स्टार्स’ हा सांस्कृतिक झाला. ‘ओंकार स्वरूपा’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘आई भवानी तुझ्या कृपेने...’ ‘दिल दिया है जान भी देंगे...’ ‘जीवाशिवाची बैलजोड...’, ‘लकडी की काँठी’, अशा मराठी, हिंदी गीतांनी सुमारे दोन तास या कलाकारांनी सूरमयी मैफल रंगविली. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित टाळ्यांच्या गजराने दाद देत होते. दीपक कारंजकर, प्रणय बेलेकर, कविता कारंजकर, स्वप्नाली तेरदाळे, सतीश हिरकुडे, शुभम चौगले, किरण चेचर, अविनाश पाटील या अंध विद्यार्थी, कलाकारांनी गायन-वादनाची मैफल रंगविली. कार्यक्रमास ‘नॅब’चे डॉ. एम. बी. डोंगरे, विजय रेळेकर, दीपक बोगार, एन.बी. शेख, ज्योती सावंत, शिवानंद पिसे उपस्थित होते.
दीक्षांत समारंभ ‘लाईव्ह’
यावर्षीचा दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण (लाईव्ह) केले जाणार आहे. दुपारी एक ते समारंभ संपेपर्यंत हे प्रक्षेपण सुरू राहील. यासाठी संकेतस्थळावर (अल्लल्ल४ं’ ूङ्मल्ल५ङ्मूं३्रङ्मल्ल ा४ल्लू३्रङ्मल्ल) या नावाने लिंक उपलब्ध करून दिली असून त्यावर क्लिक केल्यानंतर प्रक्षेपण पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Jagar of Reading Studies at the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.