शोभायात्रेत संस्कृतीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:44 IST2016-04-09T00:21:12+5:302016-04-09T00:44:08+5:30
गुढीपाडव्याचे स्वागत : नरेंद्राचार्य महाराज भक्त मंडळाचे आयोजन

शोभायात्रेत संस्कृतीचा जागर
कोल्हापूर : ‘गण गण गणात बोते’चा अखंड जयघोष, धनगरी ढोल, टाळमृदंग, लेझिम, झांज पथक, हलगी या वाद्यांच्या आवाजात शुक्रवारी ज्वलंत सामाजिक प्रश्न व भारतीय संस्कृतीचा जागर करत भव्य शोभायात्रा निघाली. जगदगुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष व गुढीपाडवा या निमित्ताने येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ यांच्यातर्फे शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. गांधी मैदानातून दुपारी साडेतीन वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. ढोल ताशे, लेझीम पथक, मर्दानी खेळ, धनगरी ढोल, गजनृत्य, झांज पथक, हालगी या वाद्याच्या निनादात निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गर्दी झाली होती. खरी कॉर्नर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळकर तिकटी, जुना बाजार, बिंदू चौक, साई मंदिर टेंबे रोड या मार्गावरून फिरून शोभायात्रेची सांगता गांंधी मैदानात झाली.
सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी, महिला जिल्हा अध्यक्ष मनिषा मगदूम यांच्यासह हिंदू संग्राम सेना, युवा सेना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी नियोजन केले.
जल है तो कल है
हिंदू धर्म खतरे मे है, गो हत्या बंद करो, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, धरती माँ करे पुकार, पर्यावरण मे करो सुधार, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, विश्वका कल्याण हो, बोलणार असाल तर विनम्र बोला, धुम्रपान छोडो आयु बढाओ, रक्तदान श्रेष्ठ दान, सभी हिंदुओंमे एकता हो, अधर्म का नाश हो, स्त्री भ्रूणहत्या बंद करा, संयम पाळा आत्महत्या टाळा, जल है तो कल है, जो दिसेल तिथे थुंकेल त्याच्यावर जग हसेल, अपव्यय टाळा, पाणी वाचवा असे फलक हातात घेऊन महिला, पुरूष, मुले सहभागी झाले होते.
संस्कृतीचे दर्शन
भव्य रथ, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी विविध वेषभूषा केलेले पथक, संतांच्या वेशभूषेतील तरूण, भगवा ध्वज व गुढी घेतलेल्या महिला, पुरूष, टाळकरी भजन, विविध लोकनृत्य तरूणी, छत्रपती शिवराय व मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकार यांचे विशेष आकर्षण राहिले. नाचणारा घोडा आणि दोन काठीवर चालणाऱ्या व्यक्तीने विशेष लक्ष वेधले.