जाधव, चाळकेंना ‘व्हीआयपी’ वागणूक

By Admin | Updated: April 9, 2015 00:08 IST2015-04-09T00:07:38+5:302015-04-09T00:08:58+5:30

इचलकरंजीचे राजकारण : पोलीस ठाण्यात कुंभार व समर्थकांचा गोंधळ; दोघांचीही जामिनावर मुक्तता

Jadhav, Chalakena 'VIP' behavior | जाधव, चाळकेंना ‘व्हीआयपी’ वागणूक

जाधव, चाळकेंना ‘व्हीआयपी’ वागणूक

इचलकरंजी : विनयभंगाची तक्रार देऊन दोन दिवस उलटले तरी नगरसेवक अजित जाधव व माजी नगरसेवक सागर चाळके यांना अटक केली नसल्याबद्दल नगरसेवक मोहन कुंभार, त्यांची पत्नी व काही महिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. खाडे यांना घेराव घालत जाब विचारला. दोघांनाही अटक केल्याचे पोलिसांनी सांगताच ते शांत झाले. त्यानंतर जाधव व चाळके यांना खासगी गाडीतून न्यायालयात नेल्याबद्दल पुन्हा कुंभार व महिलांनी गोंधळ घातला.
सोमवारी (दि. ६) प्रभागातील स्वच्छतेबद्दल नगरसेवक मोहन कुंभार व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यामध्ये प्रथम वाद झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नगरपालिका ‘बंद’चे आंदोलन केले. त्यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या कार्यालयात चालू असलेल्या चर्चेवेळी माजी नगरसेवक सागर चाळके व नगरसेवक कुंभार यांच्यात जोरदार वाद होऊन त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. तेव्हा डॉ. संगेवार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये केलेल्या तक्रारीवरून नगरसेवक कुंभार व त्यांचा मुलगा पवन यांना अटक झाली होती.
त्याच दिवशी नगरसेवक कुंभार यांनी नगरसेवक अजित जाधव, माजी नगरसेवक सागर चाळके व डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी आपल्या पत्नीचा विनयभंग केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दिली होती. मात्र, गेले दोन दिवस त्यांना अटक झाली नव्हती. म्हणून नगरसेवक कुंभार हे आपली पत्नी व दहा महिलांसह बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक खाडे यांना घेराव घालून जाब विचारला.
तेव्हा चाळके व जाधव या दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावर डॉ. संगेवार यांना अटक का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. संगेवार हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांना अटक करण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि मुख्याधिकारी दोन दिवस उपस्थित नसल्याने त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
एव्हाना पोलिसांनी जाधव व चाळके यांना न्यायालयाकडे नेले. या दोघांनाही खासगी गाडीतून नेल्याचे पाहून नगरसेवक कुंभार परत संतापले. मला अटक करून नेताना पोलीस गाडी आणि चाळके व जाधव यांना खासगी गाडीतून नेऊन तुम्ही ‘व्हीआयपी’ वागणूक देत असल्याबद्दलचा जाब कुंभार यांनी पोलिसांना विचारला आणि काही वेळ पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी दंगा केला.
दरम्यान, नगरसेवक जाधव व माजी नगरसेवक चाळके यांना बुधवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले. न्यायालयाने या दोघांचीही जामिनावर मुक्तता केली. (प्रतिनिधी)

Web Title: Jadhav, Chalakena 'VIP' behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.