जाधव, आडनाईकांना करवीर-पन्हाळ्याचे ‘बळ’
By Admin | Updated: July 18, 2015 00:19 IST2015-07-18T00:08:54+5:302015-07-18T00:19:20+5:30
बाजार समिती निवडणूक : काँग्रेसचे घटलेले मतदान विचार करायला लावणारे

जाधव, आडनाईकांना करवीर-पन्हाळ्याचे ‘बळ’
राजाराम लोंढे-कोल्हापूर -बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात शिवसेनेचे विजयी उमेदवार संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांना करवीर, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याने बळ दिले. या तालुक्यातून जाधव यांना तब्बल ६०९ तर आडनाईक यांना ४३० चे मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय अधिक सोपा झाला. करवीरमधील ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे प्राबल्य असतानाही त्यांचे घटलेले मतदान विचार करायला लावणारे आहे.
समितीसाठी पॅनेलची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांबरोबर उमेदवारही निवांत होते. विरोधी पक्षाचे स्वतंत्र पॅनेल झाले व विकास संस्थांसह ग्रामपंचायतींवरील प्राबल्य पाहता विजयासाठी फारसे झगडावे लागणार नव्हते. त्याचा प्रत्यय विकास संस्था गटात आला. या गटातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दोन हजारांपेक्षा अधिक फरकाने विजयी झाले; पण ग्रामपंचायत, अडते-व्यापारी गटात आघाडीचे उमेदवार चारी मुंड्या चित झाले. ग्रामपंचायत गटात शिवसेनेचे संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांनी मुसंडी मारत राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना धक्का दिला. पराभूत शहाजीराव वारके व विजय आबीटकर हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक आहेत. समितीच्या सत्तेवर जय-पराजयाचा काहीही परिणाम होत नसला, तरी के. पी. पाटील यांची तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने हे घातक आहे.
या उमेदवारांना मिळालेले मतदान पाहता बेरीज-वजाबाकीचे राजकारण लक्षात येते. जाधव व आडनाईक यांनी करवीर, पन्हाळा, शाहूवाडीत आघाडी घेतली तर वारके व आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड, कागल, गगनाबावड्यात मुसंडी मारली; पण मताधिक्य कमी होते.
विजयाचा मार्ग सुकर
करवीर मध्ये बहुतांशी ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत; पण काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र इंजूळकर व सचिन घोरपडे यांना या तालुक्यातून १२०० पैकी २५० च्या आतच मते मिळाल्याने जाधव व आडनाईक यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू आहे.
चंद्रदीप नरकेंचा आक्रमक प्रचार
समितीच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके ताकदीने उतरले होते. इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवत वाड्या-वस्त्यांतील संस्थेपर्यंत पोहोचले. विकास संस्थेत आपले फारसे चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण ताकद ग्रामपंचायत गटात लावली. शेवटच्या टप्प्यात त्यांनी टाकलेले फासे यशस्वी झाल्यानेच जाधव व आडनाईक यांचा विजय सोपा झाला.
तालुकानिहाय अशी मिळाली आघाडी :
उमेदवाराचे नावकरवीरकागलपन्हाळाशाहूवाडीगगनबावडाभुदरगडराधानगरी
संजय जाधव (विजयी)३५०- १४३११६ - - -
शहाजीराव वारके (पराभूत)- ४० - - ३ ११६ १५६
शशिकांत आडनाईक (विजयी)११४- २२४९२---
विजय आबिटकर (पराभूत)-५३ - -१२१३९२१०