मळगे खुर्दला पाणी पुरवणारे जॅकवेल कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:43+5:302021-05-18T04:25:43+5:30
दोन दिवस पाणीपुरवठा होणार ठप्प मुरगूड : मळगे खुर्द, ता.कागल या गावाला गेले चाळीस वर्षे पिण्याचे पाणी पुरवणारे वेदगंगा ...

मळगे खुर्दला पाणी पुरवणारे जॅकवेल कोसळले
दोन दिवस पाणीपुरवठा होणार ठप्प
मुरगूड : मळगे खुर्द, ता.कागल या गावाला गेले चाळीस वर्षे पिण्याचे पाणी पुरवणारे वेदगंगा नदीवर असलेले जॅकवेल सोमवारी सांयकाळी जमीनदोस्त झाले. यामध्ये ग्रामपंचायतीचे सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाले. मोठमोठ्या दोन मोटारीसह अन्य साहित्य पाण्यात बुडाल्याने दोन दिवस गावचा पाणीपुरवठा ठप्प होणार आहे. ग्रामपंचायत प्रशासन युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
मळगे खुर्द या गावाला वेदगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी सन १९८१-८२ साली जॅकवेल बांधले होते. साधारणतः गावापासून एक दीड किलोमीटरवर असणारे हे जॅकवेल दगड आणि सिमेंटमध्ये बांधले होते. याठिकाणी साडेबारा एचपीची एक व साडेसात एचपीची एक अशा दोन विद्युत मोटारीने जॅकवेलमधील पाणी गावातील पाण्याच्या टॉकीत टाकले जात होते. चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या जॅकवेलची वेळोवेळी दुरुस्ती केली होती. बऱ्याच ठिकाणी याला लहान- मोठ्या भेगा पडल्या होत्या.
गेल्या आठवड्यामध्ये नदीचे पाणी उतरलेले होते, पण दोन दिवसांमध्ये परत पाणी वाढले. त्यातच हे पाणी जॅकवेलमधील पडलेल्या भेगांमध्ये शिरले आणि त्यातूनच सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते नदीकडील बाजूने पूर्णपणे कोसळले. सध्या याच जॅकवेलमधून गावाला पाणी पुरवले जाते. त्यातच यावरील दोन्ही मोटारी पाण्यात बुडल्याने दोन दिवस पाणी पुरवण्यात अडचणी येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत मोटारी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी गावातील बोअरवेल व ग्रामपंचायतीच्या टँकरने पाणीपुरवठा करणार असून नागरिकांना अडचण येणार नाही, असा खुलासा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.
फोटो ओळ :- मळगे खुर्द, ता. कागल गावाला पिण्याचे पाणी पुरवणारे वेदगंगा नदीवर असणारे जॅकवेल असे नदीपात्रात कोसळले.