आयटीआयला हवाय कायापालट

By Admin | Updated: August 5, 2014 00:17 IST2014-08-04T22:03:44+5:302014-08-05T00:17:51+5:30

राज्यात विद्यार्थीसंख्या घटतेय : आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची गरज..

ITI turnover | आयटीआयला हवाय कायापालट

आयटीआयला हवाय कायापालट

चिपळूण : २१व्या शतकात आधुनिकीकरणाचे वारे वाहात असताना आजही शासनातर्फे सुरु असलेले आयटीआयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे) कोर्सेस (तंत्र व प्रशिक्षण) मात्र, जुन्या जमान्यातलेच आहेत. कारखानदारीला आवश्यक असे तंत्रकुशल कामगार या संस्थेतून निर्माण करण्यासाठी निधी मिळत नाही. त्यासाठी आवश्यक नियोजन केले जात नाही.
नवनवीन अभ्यासक्रम सुरू होत नसल्याने कोकणासह-महाराष्ट्रात हुशार, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आवश्यक ते तंत्र कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होत नाही, अशी स्थिती समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी आयटीआयचे अभ्यासक्रम म्हणजे हमखास नोकरी किंवा व्यवसाय, असे चित्र होते. मात्र, आता ते पूर्णपणे बदलत आहे. भविष्यात देशाला तसेच राज्याला तंत्रकुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज भासू शकते, तर दुसऱ्या बाजूला देश व महाराष्ट्रातील तरुणवर्गात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीमध्ये भर पडते आहे. यामुळेच ही तूट भरुन काढण्यासाठी आणि नवीन तंत्र व कुशल कामगार निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मूलभूत शासकीय व्यवस्थेकडे नवीन दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
या संस्थेमार्फत कालबाह्य प्रशिक्षण दिले जात असल्याने येथून निर्माण होणारा विद्यार्थी हा केवळ वर्षानुवर्ष अनेक कंपन्यांमधून हेल्पर-वर्कर म्हणूनच वरिष्ठांच्या हाताखाली कार्यरत राहात असल्याची वस्तुस्थिती पुढे येत आहे. ही आयटीआय क्षेत्राची दुरवस्था केवळ सरकारची अनास्था आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार व दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळेच गरीब विद्यार्थी यात भरकटले जात आहेत. त्यांना दिशा देण्याची गरज ्आहे. (प्रतिनिधी)

कोकण किंवा एकूणच महाराष्ट्रातील कारखानदारीला कोणते तंत्रशिक्षण व प्रशिक्षण गरजेचे आहे. हे समजण्यासाठी राज्य शिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन यांनी कारखानदारांबरोबर चर्चासत्र आयोजित केले तर हुशार, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल. याचे योग्य नियोजन केल्यास आज इतर राज्यांतून जे तंत्रकुशल कामगार महाराष्ट्रात येत आहेत ते थांबेल आणि इथल्याच तरुणाईला रोजगार प्राप्त होईल,
- डॉ. संजीव शारंगपाणी

४आजही अन्य नवीन कोर्सेसला प्राधान्य देण्याऐवजी इलेक्ट्रिकल, वेल्डर, डिझेल मेकॅनिकल, फिटर, मोटार मेकॅनिकल, कॉम्प्युटर आॅपरेटिंग, प्रोगॅमिंगसारखेच काही महत्त्वपूर्ण कोर्सेस सुरु आहेत.
४कोणत्याही कंपनीत आयटीयाचाच प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी हाच वर्कर किंवा हेल्पर म्हणून कार्यरत असून तो आजही अन्य पर्यवेक्षकांच्या हाताखालीच काम करीत आहे.
--कोकणामध्ये टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट, डीटीएच-केबल टीव्ही, पर्यटनसारखे कोर्सेस निर्माण करणे गरजेचे आहे. यातही केवळ रत्नागिरी व गुहागर येथे रेफ्रिजरेशनचा कोर्स सुरू आहे.
--१९९८ नंतर राज्यात एकाही आयटीआय सेंटरची निर्मिती झाली नाही. गेल्या चार वर्षांत त्याचे विस्तारीकरणही झालेले नाही. यामुळे खासगी संस्था अधिकाधिक फोफावत आहेत.
--संपूर्ण महाराष्ट्रात आयटीआयतर्फे एकूण अवघे ९२ कोर्सेस शिकविले जातात. कोकणामध्ये यापैकी ३० कोर्सेस सुरु आहेत. तालुका पातळीवर एक संस्था असली तरी आजही सुमारे १०० विद्यार्थ्यांचीच प्रवेश क्षमता आहे.
--राज्यात अशा ४२१ शासकीय संस्था आहेत. त्या स्वत:च्या प्रशस्त मालकीच्या जागेत आहेत. येथे यंत्रसामुग्री असली तरी तीही कालबाह्य होत आली असून, २० टक्के पदे रिक्त आहेत. दुसऱ्या बाजूला खासगी ३८६ संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे शासनाने आपल्या मुळातच जादा असलेल्या संस्थांचे विस्तारीकरण केल्यास व विद्यार्थी क्षमता वाढविल्यास लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मात्र, सद्यस्थितीला ही संख्या काही हजारातच मर्यादीत राहात आहे.

एक संस्था नि खासदाराचा उपक्रम...
कारखानदार संघटना आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी एकत्र येऊन १0 वर्षांपूर्वी पुण्यात खासगी आयटीआय संस्थेच्या माध्यमातून सुसज्ज असे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. कारखानदारीला आवश्यक असे तंत्रकुशल कामगार मिळावेत, हा उद्देश आहे. त्याला मुंबईतील एका तत्कालीन खासदारांनी आपल्या फंडातून २ कोटी रुपये दिले होते. हा आदर्श इतरांनीही घ्यायला हवा.

Web Title: ITI turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.