महिला बचत गटांच्या वस्तू मिळणार ऑनलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:38+5:302021-09-14T04:29:38+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार ...

Items of women self help groups will be available online | महिला बचत गटांच्या वस्तू मिळणार ऑनलाईनवर

महिला बचत गटांच्या वस्तू मिळणार ऑनलाईनवर

कोल्हापूर : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. ॲमेझॉनवरील उत्पादनाना चांगली मागणी राहिल्याने माय दुकान डॉट कॉम, मार्केट मिर्ची या ॲपवरही ५०० पेक्षा अधिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू लवकरच मिळणार आहेत. त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत नसल्याने मध्यतंरी महिलांमध्ये मरगळ आली होती, पण दहा हजारांवर महिला बचत गटांनी बदलत्या काळानुसार मागणी असणाऱ्या वस्तू उत्पादित केल्या आहेत. स्थानिक बाजारपेठ आणि प्रदर्शनातून त्यांची विक्री करीत आहेत, पण सध्या घरबसल्या ऑनलाईनवर वस्तू मागवण्याकडे कल वाढला आहे. म्हणून राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून ऑनलाईन बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. महिन्यापासून ॲमेझॉनवर बचत गटांनी तयार केलेल्या कोल्हापुरी चप्पल, गूळ, हेअर पीन, आजरा घनसाळ, मिर्ची पावडर अशा वस्तू मिळत आहेत. आता काजू, ज्वेलरी यांच्यासह इतर ५०० हून अधिक वस्तू फ्लिपकार्ट, माय दुकान डॉट कॉम, मार्केट मिर्ची या ॲपवरून ऑर्डर दिल्यानंतर मिळणार आहेत. उत्पादक ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था असल्याने ग्राहकांना बाजारपेठेपेक्षा कमी दरात यावर मिळतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

चौकट

१७ हजारांवर बचत गट

जिल्ह्यात एकूण १७ हजार ३१८ महिला बचत गटातून १ लाख ७३ हजार १८० महिला संघटित झाल्या आहेत. यातील दहा हजार महिला विविध प्रकारची उत्पादने तयार करतात. शिवाय शेतीपूरक छोटे व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्यासाठी धडपडत आहेत.

चौकट

सर्वाधिक बचत गट करवीर तालुक्यात

तालुकानिहाय महिला बचत गटांची संख्या अशी : आजरा - ८८१, गगनबावडा -६४१, भुदरगड -१५७८, चंदगड -१२५५, गडहिंग्लज -११८९ -, हातकणंगले - २३२०, कागल -१४६६, करवीर-२३७०, पन्हाळा-१३१०, राधानगरी-१५७०.

कोट

बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. आता ॲमेझॉनवर आणि फेसबुकवरील उमेद कोल्हापूर, उमेद करवीर या पेजवरून वस्तूंना ऑर्डर देता येते. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणखी उत्पादने विविध ॲपमधून मिळतील. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

डॉ. रवी शिवदास, संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.

कोट

आमच्या बचत गटातर्फे खेळांसाठीचे गणवेश, महिलांचे ड्रेस, मास्क अशा वस्तू उत्पादित केल्या जातात. त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जाते. ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध झाल्यास वस्तूंची विक्री व्यवस्था चांगली होईल.

हमीदा बंडवल, अध्यक्ष, आयेशा महिला बचत गट, मुडशिंगी.

Web Title: Items of women self help groups will be available online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.