कोल्हापूर : कसबा बावड्यात पेट्रोल चोरी करताना सापडलेला सागर भगवान रेणुसे (वय ३६, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) याच्याकडून घरफोडीच्या १४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून चोरीतील २० लाख रुपये किमतीचे १७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ किलो ६५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह वस्तू जप्त केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.कसबा बावडा परिसरात २०२१ पासून घरफोड्या करून धुमाकुळ घालणारा चोरटा सागर रेणुसे हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. चार दिवसांपूर्वी एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकीतील पेट्रोल चोरताना त्याला काही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या चौकशीत १४ घरफोड्यांची उकल झाली. गेल्या चार वर्षांपासून चोरलेले दागिने आणि चांदीच्या वस्तू त्याने घरात लपवल्या होत्या, तर रोकड खर्च केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू जप्त केल्या.
कसबा बावड्यात एका बँकेत सफाईचे करणारा रेणुसे याच परिसरात घरफोड्या करीत होता. त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार हिंदुराव केसरे, सोमराज पाटील, वसंत पिंगळे, संदीप पाटील, आदींच्या पथकाने तपास केला.