कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक एक नवा विचार, नवा आदर्श निर्माण करणारी व्हावी. जगातील जी संपन्न शहरे आहेत, ती कल्पकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर नागरी नेतृत्वानेच घडविली आहेत. आपले शहर मात्र आयुक्तांच्या इच्छेनुसार, लहरीनुसार आकार घेत आहे. शहरे आयुक्तांनीच चालवायची असतात, ही धारणा घट्ट होत चालली आहे, ही चिंतेची बाब असून शहरविकासामध्ये याच शहरातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी सक्रिय व्हायला हवे, अशी अपेक्षा शहरभान चळवळीने मंगळवारी व्यक्त केली आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्रित येऊन ही चळवळ सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत चांगले उमेदवार निवडून यावेत, यासाठी ही चळवळ प्रयत्न करणार आहे.
त्यांच्यावतीने या निवडणुकीविषयी मांडलेली भूमिका अशी : लोकशाही समाजव्यवस्थेसाठी शहरांचे अस्तित्व खूप महत्त्वाचे आहे. ‘लोकशाही या संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या आचारविचारांचे, भिन्न जातींचे, भिन्न खाद्यसंस्कृतींचे लोक एकत्र नांदत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या सहाय्यानेच भरभराटीला येत असतात. शहरी जीवन हे ‘परस्परावलंबी’ असल्याने सहिष्णुता, सहनशीलता, एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. समताधिष्ठित समाजनिर्मितीमधील शहरांचं बलस्थान सर्व समाजघटकांनी, विशेषत: राज्यकर्त्यानी समजून घेणे गरजेचे आहे.
मानवी इतिहासात २३ मे २००७ हा ऐतिहासिक दिवस मानला जातो. या दिवशी जगातील शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली. ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर, गावांचे शहरांमध्ये स्थित्यंतर, शहरांचे आर्थिक, भौतिक नियोजन या अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. हा गुंता कौशल्याने आणि कल्पकतेने हाताळावा लागतो. यासाठी वाकबगार नागरी नेतृत्वाची शहरांना गरज आहे. ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या नागरी समाजाच्या संस्था आहेत. आपल्या राजकीय व्यवस्थेने या संस्था निर्माण केल्या; पण आपल्या संस्था आपणच चालवू शकेल, असा वाकबगार नागरी समाज निर्माण करण्यास राजकीय व्यवस्था अजूनही कमी पडली आहे.
धोरणे त्यांनी का ठरवायची?
ज्या शहराची ओळख ‘कलापूर’ अशी आहे, ज्या शहरात मोठ्या संखेने आर्किटेक्टस, इंजिनिअर्स, डॉक्टर्स, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कलाकार, क्रीडातज्ज्ञ आहेत, अशा शहराची विकास धोरणे सरकारच्या अधिकाऱ्यांनी ठरविणे योग्य आहे का? कोल्हापूरमध्ये कशाचीही कमतरता नाही. आर्थिक, वैचारिक, नैसर्गिक संपन्नता असलेल्या कोल्हापूरची ‘कलापूर’ म्हणून असलेली ओळख दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे.
मनपा कुणी चालवावी...
नागरिकांच्या संस्था म्हणजेच पालिका, कोणी चालवाव्यात? गुंडानी? काळे धंदेवाल्यानी? की समाजवादी विचार जोपासणाऱ्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी? की आयुक्तांनी? याची प्रबोधनपर चर्चा या निवडणुकीच्या माध्यमातून घडावी ही अपेक्षा आहे.
गड राखला; पण कसला?
आपली माध्यमे अमक्याची सत्ता, तमक्याची सत्ता, गड राखला, गड जिंकला अशी चिथावणीखोर, फाजील ईर्षा वाढवणारी, तेढ वाढविणारी वार्तांकने करीत असतात. अनवधानाने समाजही त्यांच्या आहारी गेला आहे. निवडणुका या ‘सत्ताधीश’ निवडण्यासाठी नसतात, ‘प्रतिनिधी’ निवडण्यासाठी असतात, हे माध्यमांना समजून सांगणे गरजेचे वाटू लागले आहे.
सक्षम नेतृत्वाची आस
भारतीय संविधानाचे अधिष्ठान ‘समता’ आहे; पण वास्तवात आपली सगळी राजकीय व्यवस्था विषमतेचे पोषण करणारी झाली आहे. जातपातविरहीत ‘समताधिष्ठित समाज’ निर्माण करण्याची क्षमता शहरांमधेच आहे. पालिका सांभाळू शकेल अशा ध्येयवादी सक्षम नेतृत्वाची शहरांना आस आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नेतृत्वाचा दर्जा यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे.
विचारांची घुसळण अपेक्षित
होऊ घातलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत विधायक विचारांची घुसळण व्हावी. पालिका सभागृहाचा दर्जा उंचावला जावा. फाजील सत्ता-स्पर्धा, ईर्षा टाळली जावी. महापालिकेला दर्जेदार नेतृत्व मिळावे. आपण आपल्या क्षमतेचा वापर यासाठी करावा, असे या चळवळीला वाटते. अशा प्रयत्नांना सहकार्य देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असेही ‘माझं कोल्हापूर शहरभान चळवळी’ने म्हटले आहे.