पन्हाळ्याच्या खचलेल्या रस्त्याचे कामकाज सुरू होण्यास महिना लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:07+5:302021-08-22T04:28:07+5:30
अतिवृष्टीने रस्ता खचल्याची पाहणी पालकमंत्री, खासदार, आमदार व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. प्रत्येकाने नागरिकांना आश्वासने दिली, ...

पन्हाळ्याच्या खचलेल्या रस्त्याचे कामकाज सुरू होण्यास महिना लागणार
अतिवृष्टीने रस्ता खचल्याची पाहणी पालकमंत्री, खासदार, आमदार व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. प्रत्येकाने नागरिकांना आश्वासने दिली, पण जवळपास महिना होत आला प्रत्यक्षात कुणीही काहीच बघितले नाही. अद्याप रस्ता दुरुस्तीसाठी कसलीही हालचाल नसल्याने पन्हाळा नागरिकांच्या पाठीशी कोणीही नसल्याचा प्रत्यय लक्षात आला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता अमोल कोळी यांच्याबरोबर बातचीत केली असता ते म्हणाले, रस्ता दुरुस्तीसाठी ४.५ कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे. अद्याप शासनाने याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. तरीसुद्धा या रस्ता दुरुस्तीसाठी ऑनलाईन टेंडर प्रसिद्ध केले होते. पुण्यातील एका कंपनीने पाहणी करून ५.५ कोटी रुपयांचे टेंडर भरले. हे जादा होत असल्याने ते रद्द केले गेले. पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीच्या भूगर्भीय शास्त्रज्ञांची चारजणांची तुकडी या रस्त्याचा अभ्यास करून गेली. याचा अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल आल्यानंतर या रस्ता दुरुस्तीचे प्रस्ताव तयार होतील. ते शासनाकडे मंजुरीसाठी जातील व त्यानंतर लागणारी आर्थिक तरतूद होऊन काम सुरू होईल. या सर्वच गोष्टीला एक महिन्याचा कालावधी जाणार आहे.
पन्हाळ्यावर येण्यासाठी पर्यायी रस्ता बुधवारपेठमधील ग्रीनपार्क हॉटेल समोरुन केला जाणार आहे. ही जागा वनविभागाकडे असल्याने नगरपरिषदेकडे रोज एक कागद मागितला जातोय. त्याचा शेवट परवाना देऊन होणार आहे का हे माहीत नाही, पण तो लालफितीत अडकलाय हे निश्चित.
तीन दरवाजा येथून दुचाकी वाहनांसाठीसुद्धा परवानगी पुरातत्त्व विभागाने नाकारल्याने पन्हाळावासीयांचे संकट अधिकच गडद झाले आहे. तीन दरवाजा इमारत कमकुवत झाली असून वाहनांच्या कंपनाने इमारत कोसळल्यास सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असेल, असे जबाबदारी झटकण्याचे पत्र पुरातत्त्व विभागाने पाठवून पन्हाळकरांच्या दु:खावर डागण्या दिल्या आहेत. पन्हाळा नगरवासीय सध्या हतबल झाल्याने फक्त आणि फक्त संताप व्यक्त करत आहेत.
फोटो------- २३ जुलैच्या अतिवृष्टीने खचलेला रस्ता