भाडेकरूंची माहिती सात दिवसांत देणे बंधनकारक
By Admin | Updated: February 12, 2015 00:23 IST2015-02-12T00:02:22+5:302015-02-12T00:23:02+5:30
क्रिमिनल प्रोसिजर १९७३ (सन १९७४ चा अधिनियम क्रमांक २) मधील कलम १४४ नुसार मालमत्ताधारकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्याचे निर्देश दिले आहेत.

भाडेकरूंची माहिती सात दिवसांत देणे बंधनकारक
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व घरमालकांनी त्यांच्या जागेत असलेल्या सर्व भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यांना देणे बंधनकारक आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या महानगरपालिका , नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या किंवा मालकी असणाऱ्या मालमत्ताधारकांनी, घरे, दुकाने, फ्लॅटस्, वसतिगृहे, आदी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाडे तत्त्वावर दिली असल्यास भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास सात दिवसांच्या आत कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती विहीत वेळेत न दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी असामाजिक तत्त्वांचे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता क्रिमिनल प्रोसिजर १९७३ (सन १९७४ चा अधिनियम क्रमांक २) मधील कलम १४४ नुसार मालमत्ताधारकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आले आहे. ( प्रतिनिधी )