कोल्हापूर : गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव घेताना 'शिवाजी' हा शब्द लाखो जणांच्या तोंडी रुळला या विद्यापीठाचे नावाचा विस्तार करण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. मात्र, मोठे नाव केले तर त्याचा इंग्रजीत शॉटफॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याचा धोका पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहा दशकांपूर्वीच ओळखला होता. त्यामुळे त्यांच्याच युक्तिवादामुळे विद्यापीठाचे 'शिवाजी' हे नाव देशभर सर्वांच्या मुखात राहिले आहे.विद्यापीठाची दि. १८ नोव्हेंबर १९६२ ला स्थापना झाली. या विद्यापीठाला प्राचार्य डॉ बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये विद्यापीठाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी समिती नेमली. शिवरायांचे नाव विद्यापीठाला द्यायचे याबाबत कोणाचेही हरकत नव्हती. पण नाव कोणत्या पद्धतीने द्यायचे याबाबत समितीत मतभेद होते.याच समितीमधील कोल्हापूरचे पहिले आमदार बलवंतराव बराले यांनी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे नाव देण्याचा आग्रह धरला. मात्र, असे नाव दिले तर त्याचा शॉर्टफाॅर्म होऊन शिवरायांचे नाव लोकांच्या तोंडी राहणार नाही याची भीती यशवंतराव चव्हाण यांना होती. त्यामुळे त्यांनी आमदार बराले यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवून अशा नावाचा आग्रह धरू नका, अशी विनंती केली. त्यासाठी त्यांनी बडोद्याचे महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा उल्लेख लोकांच्या तोंडी नेहमी एम. एस. युनिव्हर्सिटी असाच असतो. अशी उदाहरणे समोर ठेवली. शिवाजी विद्यापीठ ' या नावानेच सतत उल्लेख झाला तर शिवाजी हे नाव लोकांच्या सतत डोळ्यासमोर राहील हा युक्तिवाद यशवंतरावांनी केल्याने आग्रही सदस्यांनी माघार घेऊन त्यांची सूचना मान्य केली. त्यानुसार विद्यापीठाचे नाव 'शिवाजी विद्यापीठ, असे निश्चित करण्यात आले.
मूळ नावाला हरताळराजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (आरसीएसएमजी कॉलेज) श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (एसएनडीटी), महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी (एम. एस. युनिव्हर्सिटी), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम), महात्मा गांधी मिशन (एमजीएम) या संस्था त्यांच्या मूळ नावापेक्षा शॉर्टफॉर्म नावानेच ओळखल्या जातात. हा शॉर्टफॉर्म नेमका काय आहे हेही अनेकांना माहीत नसते.
सीएसएम चालेल का..?छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव केल्यास त्याचे लघुनाव सीएसएम विद्यापीठ असे होणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनन्सचे सीएसटी असे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे लघुनाव बामु असे झाले आहे. त्यामुळे ज्या घटकांना शिवरायांचे नाव कोल्हापूर विद्यापीठाच्या नावातून पुसले जावे असे वाटते तेच लोक नामांतराच्या आडून तसा कावा करत आहेत का, अशीही विचारणा शिवप्रेमींकडून होऊ लागली आहे.
विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हे नाव फार विचारपूर्वक देण्यात आले आहे. या नावामुळे एकेरी नव्हे तर वारंवार आपल्या राजाचे नाव आपल्या तोंडी राहते याचा अभिमान आहे. एकीकडे छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात असताना नाव बदलण्यासाठी आग्रह धरणारी मंडळी या विषयावर चिडीचूप आहेत. त्यांनी विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या भानगडीत पडू नये. -वसंतराव मुळीक, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ