कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य

By Admin | Updated: October 19, 2015 00:43 IST2015-10-19T00:42:10+5:302015-10-19T00:43:48+5:30

जयंत पाटील : साखरेला हमीभाव देण्याची मागणी

It is impossible to give a one-time FRP to the factories | कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य

कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य

मुरगूड : गेल्या काही महिन्यांपासून बाजारामध्ये साखरेचा भाव उतरलेला आहे. शासनाने साखरेला प्रतिक्विंटल चार हजार रुपये हमीभाव जर दिला, तरच शेतकरी आणि साखर कारखाने तरतील. शेतकरी संघटनेने केलेली मागणी अवास्तव आहे. आताच्या परिस्थितीमध्ये कोणताच साखर कारखाना एफआरपीची रक्कम एकावेळी देऊ शकत नाही, असे स्पष्ट मत शेकापचे ज्येष्ठ आमदार भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
मुरगूड (ता. कागल) येथे जमादार चौक मित्र मंडळाने मशिदीच्या समोर बसवलेल्या दुर्गामूर्तीच्या आरतीसाठी जयंत पाटील सपत्नीक आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी गप्पा मारल्या. बिद्रीचे संचालक राजेखान जमादार यांनी स्वागत केले. जयंत पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेसह, मंत्रिमंडळातील कारभार, शासनाची उदासीनता, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.
जयंत पाटील म्हणाले, साखरेच्या निर्मितीपैकी दहा टक्के साखर खाण्यासाठी वापरली जाते. उर्वरित ९० टक्के साखरेपैकी ५० टक्के साखर शीतपेय तयार करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांना दिली जाते. त्या साखरेचा भाव ५० रुपये प्रति किलो ठेवला, तर कारखाने प्रतिटन ३५०० रुपये दर देतील. कारखान्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी को-जनरेशनसारखे प्रकल्प निर्माण करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर शहरामध्ये प्रतिगामी शक्ती डोके वर काढत असल्याबद्दल शोकांतिका व्यक्त करत ते म्हणाले, राजर्षी शाहूंच्या विचाराने प्रेरीत असणाऱ्या भूमीमध्ये पानसरेंची हत्या निंदनीय आहे. केंद्रातील आणि राज्यातील शासन सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. साहित्यिकांनी पुरस्कार परत करून केलेला निषेध योग्यच आहे.
नोकरांच्या पगारावर खर्च करायला शासनाकडे पैसा आहे. पण शेतकऱ्यांवर खर्च करताना ओरड. सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी नसल्याने अर्थसंकल्पामध्येही शेतीकडे दुर्लक्ष होते आहे. दुष्काळ निवारणासाठी शेकापच्यावतीने आपण भरीव काम करत असून, नाले बांधणे, शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरविणे, विद्यार्थ्यांना फी माफी करणे, मोफत भोजनाची व्यवस्था, आदी उपक्रमासाठी २०० हून अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, सम्राट मसवेकर, दत्तात्रय मंडलिक, प्रकाश हळदकर, संजय सुतार, अमर सणगर, सुभाष बारदेस्कर, आदी प्रमुख उपस्थित होते.

Web Title: It is impossible to give a one-time FRP to the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.