कृष्णा नदीवरील ऐतिहासिक घाटांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:30+5:302021-09-08T04:31:30+5:30
* राजकीय पाठबळ गरजेचे (कृष्णेचे दुखणे - उत्तरार्ध) शुभम गायकवाड उदगाव : करवीर संस्थानिक काळात उदगाव येथे ...

कृष्णा नदीवरील ऐतिहासिक घाटांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे
* राजकीय पाठबळ गरजेचे
(कृष्णेचे दुखणे - उत्तरार्ध)
शुभम गायकवाड उदगाव : करवीर संस्थानिक काळात उदगाव येथे राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळ्या वास्तूंचा जन्म घातला. येथे हंगामी रहिवासासाठी बंगला, घोड्याची पागा, धान्याचे कोठार, धर्मशाळा अशा वेगवेगळ्या वास्तू आजही अस्तित्वात आहेत. कृष्णा नदीकाठी हत्ती घाट व लगतच रामलिंग घाट अस्तित्वात आहे. परंतु काळानुरूप त्याचे पुनरुज्जीवन न झाल्याने या वास्तू अखेरच्या घटका मोजत आहेत. कृष्णा नदीचे घाट हे पूर्णत: खराब झाले असून, जर शाहूकालीन ठेवा जपावयाचा झाल्यास पहिल्यांदा कृष्णा नदीच्या घाटांचे पुनरुज्जीवन करणे अगत्याचे आहे.
उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली-कोल्हापूर महामार्गामुळे नेहमीच रेलचेल आहे. उदगावमधून जयसिंगपूर वसविताना शाहू महाराजांनी उदगावचा दर्जाही अबाधित ठेवला होता. वेगवगळ्या वास्तूंच्या स्वरुपात त्याला महत्व होते. परंतु बदलत्या सामाजिक घडामोडीमुळे त्या वास्तू धूळखात आहेत. कृष्णा नदीकाठी असलेल्या रामलिंग मंदिराशेजारील रामलिंग घाट व हत्ती घाट पूर्णत: खराब झाले आहेत. येथे तीन मोठे पूल अस्तित्वात आहेत. या घाटांचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिला आहे. त्यासाठी जि. प. सदस्या स्वाती सासणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. याठिकाणी गेली कित्येक वर्षे कृष्णामाई जलतरण मंडळाच्या माध्यमातून स्वच्छता राखली जाते. नेहमीच किरकोळ खर्च करून सुशोभीकरण केले जाते. परंतु, याचा आराखडा मोठा असल्याने शासकीय योजनेतून या घाटाला पर्यटन महत्व लाभू शकते. त्यामुळे एवढ्या मोठ्या ऐतिहासिक घाटाला सुशोभीकरण करून जिवंत ठेवणे अगत्याचे आहे.
कोट -
ऐतिहासिक अशा कृष्णा नदीवरच्या घाटासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रव्यवहार केला आहे. पुन्हा एकदा यासंदर्भात भेट घेऊन हा ठेवा जपण्यासाठी पर्यटन व पर्यावरण विभागाच्या योजनेतून घाट सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार आहे.
- स्वाती सासणे, जि. प. सदस्या
फोटो - ०७०८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथील राजर्षी शाहू पुलाजवळील घाटाची अशी दुरवस्था झाली आहे. (छाया-अजित चौगुले उदगाव)