रुग्णसंख्या कमी होत नाही हे अपयश म्हणायचे का..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:43+5:302021-06-18T04:16:43+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने उत्तम काम केले होते, हा पूर्वानुभव असताना साथ आटोक्यात येत नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ...

रुग्णसंख्या कमी होत नाही हे अपयश म्हणायचे का..?
कोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने उत्तम काम केले होते, हा पूर्वानुभव असताना साथ आटोक्यात येत नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण कोल्हापुरात आहेत, हे प्रशासनाचे अपयश म्हणायचे का ? असा सवाल आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनास केला.
कोल्हापूर शहरातील कोरोनाचा आढावा व ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचारी यांच्या समस्येबाबत बैठकीत ते बोलत होते. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
आढावा बैठकीत जी चर्चा होते, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. प्रशासनाने निर्बंध कडक करावेत, होम क्वॉरंटाइन बंद करावे, ट्रेसिंग वाढवावे, आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात; मात्र एक जुलैपर्यंत रिझल्ट द्यावेत, अशा सूचनाही जाधव यांनी दिल्या.
आरोग्य विभागातील सर्व ठोक मानधन कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा झाली. या वेळी सर्व ठोक मानधन कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचा निर्णय झाला. समान काम समान वेतन, सेवेत कायम सामावून घेणे, प्रसूती रजा व आजारी-किरकोळ रजा, आरोग्य विमा, प्रॉव्हिडेंट फंड आदी विषयांवर चर्चा झाली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले.
बैठकीस उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, जलअभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे, सहायक आयुक्त चेतन फोंडे, आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक पोळ, डाॅ. प्रकाश पावरा, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, लाल बावटा युनियनचे कॉम्रेड चंद्रकांत यादव, डॉ. रेवती हिरेमठ, जॉन भोरे, नम्रता मुळे, दक्षता समुद्र, शीतल बावडेकर, मेघराणी शिंदे, जुलिया मोहिते, डॉ. स्वप्निल जाधव उपस्थित होते.
नागरिकांचे सहकार्य नाही : बलकवडे
नागरिक अजूनही नियम पाळत नाहीत व प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याची तक्रार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. शहराच्या आरोग्य यंत्रणेवर ग्रामीण भागाचा सुमारे ४० टक्के भार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जे नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत, त्यांच्यात प्रबोधन करा, सूचना द्या आणि यावरही सहकार्य मिळत नसेल तर कारवाई करा, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.
(फोटो देत आहे)