समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव हे कर्तव्य
By Admin | Updated: November 14, 2014 23:58 IST2014-11-14T23:35:33+5:302014-11-14T23:58:44+5:30
डॉ. सूरज पवार : रोटरी पुरस्काराने अभ्यंकर, पाटील, सपाटे, डॉ. दंडगे यांचा सन्मान

समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव हे कर्तव्य
कोल्हापूर : ‘प्रसिद्धीपासून दूर राहून समाजसेवा करणाऱ्या दुर्मीळ लोकांचा गौरव करणे हे ‘रोटरी’चे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन ‘रोटरी’चे असिस्टंट गव्हर्नर डॉ. सूरज पवार यांनी केले. रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर आणि रोटरी समाजसेवा केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या निवासराव पोवार स्मृती रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. येथील रामभाई सामाणी हॉलमध्ये हा पुरस्कार वितरणाचा समारंभ झाला.
‘रोटरी’च्यावतीने कर्णबधिर मुलांना बोलायला शिकविणाऱ्या शिक्षिका मंगल अभ्यंकर, योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सुनंदा पाटील, बुरुड समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारे विलासराव सपाटे, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी आपल्या लिखाणातून स्त्रियांचे विविध प्रश्न हाताळणाऱ्या डॉ. प्रिया दंडगे यांचा स्मृतिचिन्ह, रोख एकवीसशे रुपये देऊन गौरव केला.
रोटरी समाजसेवा केंद्राचे उपाध्यक्ष व्ही. एन. देशपांडे म्हणाले. ‘आपला व्यवसाय सांभाळून समाजासाठी काही करावे हीच ‘रोटरी’ची भूमिका असून, समाजातील अशा लोकांना रोटरी क्लब प्रकाशात आणण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहे.’
रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. भरत सोमैय्या यांनी परिचय करून दिला. सुनंदा पाटील व डॉ. प्रिया दंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मंदार पाटील, भारत खराटे यांच्यासह ‘रोटरी’चे पदाधिकारी उपस्थित होते. जितेंद्र पार्टे यांनी आभार मानले.
कोल्हापुरात बुधवारी रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर व रोटरी समाज केंद्राच्यावतीने निवासराव पवार स्मृती व्यवसाय सेवा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी डावीकडून डॉ. मंदार पाटील, व्ही. एन. देशपांडे, डॉ. सूरज पवार, सुभाष मालू, जितेंद्र पार्टे, भरत सोमैय्या, विजेत्या डावीकडून डॉ. प्रिया दंडगे, सुनंदा पाटील, मंगल अभ्यंकर, विलासराव सपाटे.