‘लोकमत’मुळेच रुजले वाचन संस्कार

By Admin | Updated: August 1, 2014 00:39 IST2014-07-31T23:38:56+5:302014-08-01T00:39:00+5:30

विविध शाळांतील मुख्याध्यापकांचे मत : ‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तकाचे प्रकाशन

It is due to 'Lokmat' | ‘लोकमत’मुळेच रुजले वाचन संस्कार

‘लोकमत’मुळेच रुजले वाचन संस्कार

कोल्हापूर : सोशल मीडियाच्या जमान्यात सर्वांचे वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वाचनाने जीवन समृद्ध व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. दुर्दैवाने आजच्या काळात वाचनाची गोडी लागण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. मात्र,‘लोकमत’च्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती नक्कीच रुजेल, असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. निमित्त होते ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे देण्यात येणाऱ्या ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तक प्रकाशनाचे.
येथील लोकमत शहर कार्यालयात आज, गुरुवारी शहरातील विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख होते.
चाटे समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे म्हणाले, ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, तर निर्माण होणारच आहे; पण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. या पुस्तकामध्ये अनेक थोर व्यक्तींची माहिती अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल.
पी. आर. मुंडरगी हायस्कूलचे मुख्याध्यापक शाम गुरव म्हणाले, आज विद्यार्थ्यांसोबत शिक्षक अवांतर वाचनापासून दूर जात आहेत. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. ‘लोकमत’चा वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचा पुढाकार कौतुकास्पद आहे.
यावेळी ‘लोकमत’चे सहायक व्यवस्थापक (इव्हेंट) दीपक मनाठकर यांनी ‘बालविकास मंच’बाबत माहिती दिली. ‘लोकमत’चे सहायक सरव्यवस्थापक (रेस दक्षिण) संजय पाटील उपस्थित होते. एम. एल. जी. शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी वळिवडेकर, भारती विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण शिंदे, चाटे स्कूलचे मुख्याध्यापक बी. एस. वडगावे, माईसाहेब बावडेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सोनबा कुंभार, विमला गोयंका शाळेच्या मुख्याध्यापिका सायली जोशी, प्रि. पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक महेश सूर्यवंशी, श्रीराम स्पोर्टस्चे शिरीष पाटील, आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कथा....
लोकमत बालविकास मंच सभासदांसाठी हे ‘सक्सेस स्टोरीज’ हे पुस्तक मोफत देण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये अब्राहम लिंकन, वॉल्ट डिस्ने, एम. एम. हुसेन, चार्ली चॅप्लिन, कल्पना चावला, स्टिव्ह जॉब्स्, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, नेल्सन मंडेला यासारख्या अनेक महान व्यक्तिमत्त्वांविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या महान व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील घटनांच्या आधारे यशस्वी कसे व्हायचे, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळणार आहे.

‘कौन बनेल स्मार्ट’ चा गुरुवारी लकी ड्रॉ
‘लोकमत’तर्फे २०१३-१४ या वर्षी घेण्यात आलेल्या ‘कौन बनेल स्मार्ट’ या स्पर्धेचा लकी ड्रॉ गुरुवारी काढण्यात आला असून, या स्पर्धेतील सर्व विजेत्यांची नावे शनिवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Web Title: It is due to 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.