‘दक्षिण रत्नागिरी शिक्षण’मधील वाद चिघळला

By Admin | Updated: November 27, 2014 23:59 IST2014-11-27T23:39:22+5:302014-11-27T23:59:38+5:30

जुन्या संचालकांचे नवीन मंडळ : सावंतवाडीकरांचा मात्र राजघराण्यावर विश्वास

The issue of 'South Ratnagiri Education' has got turbulent | ‘दक्षिण रत्नागिरी शिक्षण’मधील वाद चिघळला

‘दक्षिण रत्नागिरी शिक्षण’मधील वाद चिघळला

सावंतवाडी : गेली कित्येक वर्षे सावंतवाडीसह आजूबाजूच्या परिसरात शिक्षणाचे योगदान देणाऱ्या कै. शिवरामराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचम खेमराज महाविद्यालयात धुसफुसत असलेला वाद आज, गुरुवारी चव्हाट्यावर आला.
मूळ संचालक मंडळाला अंधारात ठेवत नवीन संचालक मंडळ नेमण्याचा घाट संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला. या सर्व प्रकारामुळे सावंतवाडीतील नागरिकांनी राजघराण्याच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निश्चय केला आहे. आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सायंकाळी उशिरा राजमातांची भेट घेत पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, नवीन संचालक मंडळाने संस्थेच्या कार्यालयातील कपाटातील सामानाची तसेच कागदपत्राची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. दक्षिण रत्नागिरी प्रसारक मंडळाचे पंचम खेमराज महाविद्यालय हे एकमेव कॉलेज असून, या कॉलेजमध्ये सावंतवाडीसह आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. कोकणातील एकमेव कॉलेज असे आहे की, त्यात सर्व विषयांचे वर्ग घेतले जातात. त्यामुळे कोकणात या महाविद्यालयाला विशेषमहत्त्व आहे. मात्र, सहा महिने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही विषयांवरून वाद सुरू होते.
संस्थेचे पदाधिकारी मोहन देसाई व पी. एफ. .डॉन्टस यांनी जुन्या संचालक मंडळाला शह देण्यासाठी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या कन्या शिवप्रिया भोगले यांना कार्याध्यक्ष, तर अन्य चारजणांना संस्थेच्या विविध पदावर नेमले. त्यानंतर शिवप्रिया भोगले व त्यांचे पती कुमार भोगले यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्थेत चाललेला भ्रष्टाचार तसेच महाविद्यालय विकण्याचा घातलेला घाट यामुळे आम्ही याठिकाणी आलो असून आता यापुढे सतत येऊ, असे स्पष्ट केले.
तसेच पी. एफ. डॉन्टस व एम. डी. देसाई यांनी संस्थेच्या कपाटातील काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली असल्याची लेखी तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
हा सर्व प्रकार सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या परिसरात घडत असतानाच याची कुणकुण नागरिकांना लागली. त्यानंतर सावंतवाडीतील वातावरण आणखी चिघळू लागले. आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सदासेन सावंत, शिवाजी सावंत, अ‍ॅड. सुभाष देसाई, नकुल पार्सेकर, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, यशवंत देसाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी राजमाता यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच यापुढे सावंतवाडीत येऊन कोणी आपली मक्तेदारी दाखवत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी भूमिकाही घेतली. (प्रतिनिधी)




देव पाटेकर त्यांना
चांगली बुद्धी देवो
जे काही शिक्षणक्षेत्रात घडत आहे ते आता लोकांनीच पहावे. आम्ही त्यावर काहीही बोलणार नाही. आमचा विश्वास देव पाटेकरांवर असून त्यानेच त्यांना चांगली बुद्धी द्यावी, असे मत अ‍ॅड. सुभाष देसाई यांनी नवीन संचालक मंडळाच्या निवडीबाबत राजमातांच्यावतीने बोलताना व्यक्त केले.



नवीन मंडळाचा चेंज रिपोर्ट सादर करणार
जुन्या पदाधिकाऱ्यांनी नवीन संचालक मंडळ स्थापन करण्याचा घाट घातला
आहे. याबाबतचा चेंज रिपोर्ट लवकरच धर्मादाय आयुक्तांना सादर करू, असा विश्वास पी. एफ. डॉन्टस यांनी व्यक्त केला. तसेच राजमातांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Web Title: The issue of 'South Ratnagiri Education' has got turbulent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.