सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: February 25, 2015 00:07 IST2015-02-24T23:46:57+5:302015-02-25T00:07:41+5:30
शाहू मराठी शाळा प्रभाग : विकासकामांना गती; काही ठिकाणी निधीअभावी रस्ते, गटारींची कामे अपूर्ण

सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न गंभीर
कसबा बावडा : ठोंबरे मळा, जाधव मळा, यशवंत कॉलनी, कृष्णानंद कॉलनी, आनंद स्वरूप पार्क, आदी परिसरांसह १९ लहान-मोठ्या नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांसह शेतीचा मोठा भाग असलेल्या ‘राजर्षी शाहू मराठी शाळा’ प्रभाग क्र. २ मधील रस्ते, पाणीपुरवठा, रस्त्यांवरील दिवे यांची बऱ्यापैकी स्थिती असली तरी प्रभागाच्या पूर्वेकडील असणाऱ्या ठोंबरे मळा, जाधव मळा, माळी मळा, आनंद स्वरूप पार्क, आदी कॉलन्यांतील सांडपाण्याच्या निर्गतीचा प्रश्न मात्र गंभीर आहे. सांडपाण्याची निर्गत होत नसल्याने ठोंबरे मळ्यापासून ते माळी मळ्यापर्यंत रस्त्यावर उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात कायम दलदल असते.
प्रभागात नगरसेविकांचा संपर्क चांगला असला तरी प्रभागाचा विस्तार प्रचंड मोठा असल्याने तसेच शेतवाडीत दिवसेंदिवस प्लॉट पाडून कॉलन्या विकसित होत असल्याने निधीअभावी काही कॉलनीत रस्ते, गटारींची कामे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही विकासकामे प्रभागात मोठ्या प्रमाणात झाली आहेत. प्रभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत नसल्याचे दिसून येते.श्रीराम सोसायटीपासून यशवंत कॉलनी, गणेश कॉलनी, न्यू यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, रत्नदीप कॉलनी, पंचरत्न कॉलनी, महालक्ष्मी पार्क, तसेच मूळ गावठाणातील चव्हाण गल्ली, धनगर गल्ली, कवडे गल्ली, रणदिवे गल्लीपासून ते बावडा कदमवाडी रोडवरील देवार्डे मळ्यापर्यंत अशा भौगोलिक रचनेत हा प्रभाग विखुरला आहे. प्रभागाचा निम्म्याहून अधिक भाग शेतवाडीत प्लॉट पाडून विकसित झाला आहे. यामुळे या मतदार संघातील नागरिकांची संख्या वाढली आहे. मूळ गावठाणातील राहणारे तसेच बाहेरून आलेले व येथे प्लॉट घेऊन, बांधकाम करून स्थायिक झालेल्या उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, कष्टकरी तसेच शेतकरी लोकांचा या प्रभागात समावेश आहे.
जयंती नाला येथून पाईपलाईनने आणलेले सांडपाणी लाईन बाझार ड्रेनेज प्लॅँट येथे सोडले आहे. तेथून ते पाईपने प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या समोरील विहिरीत सोडले आहे. तेथून ते काही शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले आहे; परंतु या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने तसेच पूर्वेकडील कॉलन्यांमधील सांडपाणी निर्गत न झाल्याने हे संपूर्ण पाणी शेतवाडी आणि माळी मळा रस्त्यावर पसरते. याबाबतच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत; परंतु त्यावर अद्याप उपाययोजना झालेली नाही. या प्रभागात रस्ते, पाणी, रस्त्यांवरील दिवे यांची सोय चांगली आहे. मात्र, गटारी साफ करण्यासाठी तसेच रस्ते साफ करण्यासाठी सफाई कामगार येत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. नवीन विकसित झालेल्या कॉलनीत रस्ते, गटारींची कामे करण्यात नगरसेविका वंदना बुचडे यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी रस्ते न झाल्याने नागरिकांची नाराजी आहे. प्रभागात जास्तीतजास्त विकासकामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
प्रभागात आतापर्यंत पावणेचार कोटींची विकासकामे केली आहेत. त्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील रस्ते करण्यावर एक कोटी ४० लाख रुपये खर्च केले. तसेच गटर करण्यासाठी ८० लाख, पिण्याच्या पाण्याची पाईप टाकण्यासाठी ३० लाख, शाळा व भाजी मार्केट दुरुस्तीसाठी २२ लाख, चॅनेल बांधणीसाठी ६० लाख, पाणंद रस्ते दहा लाख, पॅव्हेलियन ग्राऊंड दुरुस्तीसाठी नऊ लाख व स्वच्छतागृहासाठी १२ लाख, असे तब्बल पावणेचार कोटी रुपये विकासकामांवर खर्च केले आहेत.
प्रभागातील धनगर गल्लीतील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणासाठी स्वत:हून आपली घरे पाडून पाच-पाच फूट जागा रस्त्यासाठी दिली. त्यामुळे अरुंद असणारी धनगर गल्ली रुंद झाली. आपल्या कारकिर्दीतील हे सर्वांत चांगले काम झाल्याचे नगरसेविका वंदना बुचडे यांना वाटते.
- वंदना सुभाष बुचडे, नगरसेविका