इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:23+5:302021-03-26T04:22:23+5:30
दिंडनेर्ली : इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असणाऱ्या गणेश मंदिराजवळ दोन दिवसांपूर्वी एक कुत्रे मरून ...

इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
दिंडनेर्ली : इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असणाऱ्या गणेश मंदिराजवळ दोन दिवसांपूर्वी एक कुत्रे मरून पडले होते. आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने इस्पुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील यांना धारेवर धरले.
कोरोना लसीकरणासाठी व इतर उपचारांसाठी परिसरातील वयोवृद्ध मंडळी व महिला रुग्ण मोठ्या संख्येने दिवसभर केंद्रात येत असतात. आरोग्य केंद्राच्या सभोवताली संरक्षक भिंत असून मुख्य इमारतीच्या शेजारी गणपतीचे एक छोटे मंदिर आहे. या मंदिराला लागून मंगळवारी रात्री गावातील एक भटके कुत्रे मरून पडले होते. बुधवारी दिवसभर तिकडे कोणीही लक्ष दिले नसल्याची माहिती ग्रामपंचायतीस मिळाली, तेव्हा नूतन सरपंच राजाराम पाटील-म्हाकवेकर, उपसरपंच राजाराम चौगुले तसेच शंकर मगदूम व इतरांनी आरोग्य केंद्रात जाऊन डॉ. रोहित पाटील यांना याबाबत धारेवर धरले. या प्रकारावरून सरपंच व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून पुन्हा हलगर्जीपणा करू नका, असेही बजावले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
कोरोना लसीकरण सुरू असल्यामुळे आरोग्य केंद्रात गर्दी होती. त्यामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित शिपायांना ताकीद दिली असून त्यांच्याकडून पुन्हा कामात हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे डॉ. शैलजा पाटील यांनी स्पष्ट केले.