इस्लामपूर संघ उपांत्य फेरीत
By Admin | Updated: January 20, 2015 00:22 IST2015-01-20T00:11:46+5:302015-01-20T00:22:17+5:30
सुवर्णचषक हॉकी स्पर्धा : कोल्हापूरही अंतिम चारमध्ये; आज फायनल

इस्लामपूर संघ उपांत्य फेरीत
इस्लामपूर : मातोश्री सुभद्रा डांगे फौंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत यजमान डांगे फौंडेशनसह छावा आणि महाराष्ट्र कोल्हापूर व कोल्हापूर पोलीस या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या (मंगळवारी) सकाळी उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर दुपारी अंतिम सामना होईल.
येथील पोलीस कवायत मैदानावर तीन दिवसांपासून मातोश्री सुभद्रा डांगे सुवर्णचषक हॉकी स्पर्धा सुरु आहेत. उद्या (मंगळवारी) स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. विजेत्या संघाला २१ हजार रुपये आणि सुवर्णचषक, तर उपविजेत्यांना ११ हजार रुपये आणि रौप्यचषक दिला जाणार आहे. आजच्या दिवसभरातील सामन्यांतून अमित शिपुरे (कोल्हापूर पोलीस), कपिल मोरे (छावा, कोल्हापूर), स्वप्निल थोरात (तिरंगा, नूल) व सागर ढेरे (मातोश्री, इस्लामपूर) हे ‘सामनावीर’ पुरस्काराचे मानकरी ठरले.
उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना कोल्हापूर पोलीस विरुद्ध दिग्विजय नाईक फौंडेशन इचलकरंजी यांच्यात झाला. पोलीस संघाने हा सामना एक-शून्य असा जिंकला. छावा कोल्हापूरने चार-शून्य अशा फरकाने कोल्हापूरच्या श्याम स्पोर्टस्चा पराभव केला. महाराष्ट्र कोल्हापूरने नूलच्या तिरंगा स्पोर्टस्वर मात केली. तसेच यजमान डांगे फौंडेशनने सातारा संघाचा पराभव केला.
उद्या (मंगळवारी) सकाळी साडेआठला डांगे फौंडेशन विरुध्द छावा कोल्हापूर आणि महाराष्ट्र कोल्हापूर विरुध्द कोल्हापूर पोलीस यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील. सागर जाधव, मुश्ताक खाटीक, योगेश देशपांडे यांनी पंच म्हणून, तर अनिल शिंदे, रोहित पवार यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)