इस्लामपूरकरांना ‘साई के नाम पर’ लाखोंचा गंडा
By Admin | Updated: May 23, 2015 00:26 IST2015-05-23T00:14:13+5:302015-05-23T00:26:13+5:30
हे लेखन इंग्रजीतील पहिल्या लिपीत (कॅपिटल) करणे अनिवार्य आहे. लेखनासाठी संबंधित पुस्तक, कागद आणि पेन कंपनीकडून पुरवण्यात येतात.

इस्लामपूरकरांना ‘साई के नाम पर’ लाखोंचा गंडा
अशोक पाटील - इस्लामपूर -इबीझ, सेराजेम, सोनपरी डॉल या कंपन्यांनी बोगस योजनांतून इस्लामपूर शहरात कोट्यवधी रुपये हडप केल्यानंतर आता साई एंटरप्रायझेस या कंपनीने साईभक्तांच्या भावनेलाच हात घातला आहे. साईबाबांच्या कथित चमत्कारांच्या इंग्रजीतील कथासंग्रहाचे पहिल्या लिपीत (कॅपिटल) बिनचूक पुनर्लेखन करणाऱ्याला तीन हजार रुपयांचे आमिष दाखविले जात आहे. यासाठी ९५० रुपयांचे प्रवेश शुल्क भरून घेतले जात असून याद्वारे सुशिक्षितांची फसवणूक सुरू आहे. साई एंटरप्रायझेसच्या माध्यमातून बसस्थानक परिसरातील फल्ले बिल्डिंगच्या सभागृहामध्ये सेमिनार भरविण्यात येते. या सेमिनारसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. सेमिनारमध्ये नाशिक येथून आलेले अधिकारी माहिती देतात. या योजनेत भाग घेणाऱ्यांना साईबाबांच्या कथित चमत्कारांच्या इंग्रजीतील ‘श्री साईबाबा’ या शंभर पानी कथासंग्रहाचे बिनचूक पुनर्लेखन करावे लागते. हे लेखन इंग्रजीतील पहिल्या लिपीत (कॅपिटल) करणे अनिवार्य आहे. लेखनासाठी संबंधित पुस्तक, कागद आणि पेन कंपनीकडून पुरवण्यात येतात.
असा कापला जातो मोबदला
या योजनेसाठी काही नियम व अटी आहेत. एकमेकांना चिकटलेली अक्षरे, स्पेलिंगमधील चुका, खाडाखोड, गिरवलेले अक्षर या त्रुटींची संख्या मोजून त्यांचे विशिष्ट प्रमाण धरून त्यानुसार पैसे कपात केले जातात. वेळेत काम पूर्ण न झाल्यास शंभर रुपयांचा दंड आकारला जातो. या योजनेतील खरी मेख येथेच आहे. मोबदल्याची कपात कशी होणार, याची पूर्ण माहिती सेमिनारमध्ये दिली जात नाही. शिवाय पुनर्लेखनाची तपासणी कोणाही तज्ज्ञांमार्फत केली जात नाही. परिणामी पढवून ठेवलेल्या तपासनिसांमार्फत ‘घाऊक’ पद्धतीने चुका काढल्या जातात आणि मोबदल्याची रक्कम कापली जाते.