घरपट्टीविरोधात इस्लामपूर मंगळवारी बंद
By Admin | Updated: March 17, 2015 00:06 IST2015-03-16T23:08:52+5:302015-03-17T00:06:06+5:30
व्यापाऱ्यांतून नाराजीचा सूर : घरपट्टी अवास्तव असल्याचा नगराध्यक्षांनीच दिला घरचा अहेर

घरपट्टीविरोधात इस्लामपूर मंगळवारी बंद
अशोक पाटील - इस्लामपूर शहरातील मालमत्तेचा नाशिक येथील स्थापत्य कन्सल्टने सर्व्हे केला आहे. याच सर्व्हेवरून नगरविकास खात्याने अवास्तव घरपट्टी आकारल्याची कबुली खुद्द नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी देऊन सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. तसेच भाजपचे विक्रमभाऊ पाटील, विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी घरपट्टीविरोधात मंगळवारी इस्लामपूर बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर आहे.
इस्लामपूर पालिकेने अवास्तव घरपट्टी आकारुन मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे मालमत्ताधारक हवालदिल झाले आहेत. स्वत:च्या घरात राहण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे परवडेल, अशीच प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहे. तसेच स्वत: नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हे अन्यायी घरपट्टी आकारल्याची कबुली देत, आम्ही ती कमी करणार असल्याची ग्वाही देत आहेत. तसेच दुसरीकडे विरोधक या अन्यायी घरपट्टीविरोधात इस्लामपूर बंदची हाक देऊन व्यापाऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.इस्लामपूर शहरातील नियोजित विकास आराखड्याचा अजूनही पत्ता नाही. गुंठेवारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एका भूखंडाची खरेदी चार-चार वेळा केल्याचीही प्रकरणे उघड झाली आहेत. विनापरवाना हजारो बांधकामे करण्यात आली आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासाठी शासकीय कार्यालयातून हजारो रुपये उकळले जात आहेत. या संकटातून मालमत्ताधारक बाहेर पडण्याअगोदरच इस्लामपूर पालिकेने चौपट घरपट्टी केल्याचा दावा विरोधक करीत आहेत. तसेच सत्ताधारी मंडळी घरपट्टी कमी करण्यासाठी अपील फॉर्म दाखल करण्याच्या तयारीला लागली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने सर्वसामान्य व व्यापारी वेठीस धरले गेले आहेत. त्यातच कोणत्याही कारणासाठी शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांना वेठीस धरले जाते. बंद हा प्रत्येक प्रश्नावरील पर्याय नव्हे, अशीच संतप्त प्रतिक्रिया व्यापारी व सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीने इस्लामपुरात विकासाची गंगा आणली आहे. मालमत्तेची फेरमोजणी नाशिक येथील स्थापत्य कन्सल्टने केली आहे. या कंपनीच्या शिफारशीनुसार नगरविकास खात्याने अवास्तव घरपट्टी आकारली आहे. ही घरपट्टी
कमी करण्यासाठी आमचे
नगरसेवक कामाला लागले आहेत. इस्लामपूर बंद हा पर्याय नसून व्यापारी व नागरिकांना वेठीस धरु नये.
- सुभाष सूर्यवंशी,
नगराध्यक्ष
इस्लामपूर पालिकेने मालमत्ताधारकांना नियमबाह्य नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये ५ हजार मालमत्ताधारकांचा समावेश आहे. १३ हजार मालमत्ताधारकांनाही नोटिसा देण्यात येणार आहेत. अगोदरच सर्वसामान्य नागरिक गुंठेवारी नियमित करण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यातच अवास्तव घरपट्टी आकारल्याने नागरिकांना स्वत:च्या घरात राहणेही मुश्कील होईल.
- विक्रमभाऊ पाटील,
प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमो
नागरिक, व्यापारी नाहक वेठीस...
इस्लामपूर पालिकेने अवास्तव घरपट्टी आकारुन मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे मालमत्ताधारक हवालदिल झाले आहेत. शहरातील नागरिकांचा संताप पाहून सत्ताधारी ही घरपट्टी कमी करण्याची ग्वाही देत आहेत. तर दुसरीकडे विरोधक या घरपट्टीविरोधात शहर बंदची हाक देऊन नागरिकांसह व्यापाऱ्यांना वेठीस धरत आहेत.