पाटबंधारेचे अधिकारी कर्नाटकचे हस्तक
By Admin | Updated: November 23, 2015 00:05 IST2015-11-22T23:28:48+5:302015-11-23T00:05:05+5:30
हसन मुश्रीफ : चिकोत्रा धरण भरण्यासाठी योजना

पाटबंधारेचे अधिकारी कर्नाटकचे हस्तक
मुरगूड : काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला पाणी मिळाले पाहिजे. कर्नाटकला त्यांच्या वाटणीचे पाणी देण्यास कुणाचाच विरोध नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी अधिक मेहरबान होऊन महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकला जास्त पाणी देत आहेत यामागचे गौडबंगाल शोधले पाहिजे. असे प्रकार यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. मुरगूड (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळम्मावाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाणी असूनही कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, याला पाटबंधारे विभागच जबाबदार आहे. धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडले पाहिजे आणि शेतकऱ्यांनीही ते जपून वापरले पाहिजे. काळम्मावाडीच्या दोन्ही कालव्यांकडे यावेळी अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे सांगून काही ठिकाणी दरडी कोसळल्या, झुडपे वाढलेली व गाळ साचला आहे. यांत्रिकी विभागाने कालवा दुरुस्त केला नसल्याने पाणी पुढे सरकलेच नाही. परिणामी, म्हाकवे भागातील पिके वाळली आहेत. पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हे झाले आहे असून यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. चिकोत्रा प्रकल्पामध्येही कमी पावसामुळे ४६ टक्के इतकाच पाणी साठा आहे. यामुळे या संपूर्ण खोऱ्यात पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. उत्तूर, सेनापती कापशी परिसरातील हातातोंडाला आलेली पिके वाळून जात आहेत. त्यामुळे प्राधान्याने या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी चिकोत्रा धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नागनवाडी व आंबेओहळ हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्थांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबरला पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. चिकोत्रा धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी भुदरगड तालुक्यातील म्हातारीच्या पठारावारील पश्चिम वाहिनी ओढ्याचा मार्ग बदलण्यासाठी २५० मीटर लांब व अडीच मीटर उंच
असा बांध घालून हे पाणी चिकोत्रा धरणात सोडण्याची योजना झाली आहे. या कामाचा प्रारंभ २५ नोव्हेंबरला आमदार प्रकाश आबिटकर व आपल्या उपस्थित होणार आहे. या पत्रकार परिषदेत रणजित सूर्यवंशी, परेश चौगले, महादेव हळदकर, माजी उपनगराध्यक्ष शामराव चौगले, किरण पाटील, विजय हुल्ले, दगडू किल्लेदार, दिगंबर परीट, दत्तात्रय हासबे,
देवानंद पाटील, एकनाथ हासबे, एम. डी. रावण, आदी प्रमुख उपस्थित होते.