धरणग्रस्त जमीन वाटपात अनियमितता; धरणग्रस्तांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:42+5:302021-09-11T04:25:42+5:30
जमीन नाही तर पैसे द्या; रुकडीवाडी येथील धरणग्रस्तांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव : दूधगंगा धरणग्रस्त जमीन वाटपामध्ये ...

धरणग्रस्त जमीन वाटपात अनियमितता; धरणग्रस्तांचा आरोप
जमीन नाही तर पैसे द्या; रुकडीवाडी येथील धरणग्रस्तांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
रुकडी माणगाव : दूधगंगा धरणग्रस्त जमीन वाटपामध्ये ५०० हेक्टरचा जमिनीचा घोटाळा झाला असून मुख्य धरणग्रस्तांना ४० वर्षांपासून जमीन मिळाली नाही. जर जमीन नसेल, तर जमिनीच्या मोबदल्यात एकरी ७० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रुकडी येथील काळम्मावाडी विस्थापित धरणग्रस्तांनी केली आहे. उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.
दूधगंगा धरण क्षेत्रातील शेरवडे, ननिवळे, काबरंडे, भादणे, कोनोली, वाकीसह नऊ वाड्यांतील विस्थापितांचे रुकडीवाडी येथे पुनवर्सन करण्यात आले आहे. या विस्थापितांना शासन नियमाप्रमाणे शेतजमीन वाटप होणे आवश्यक असताना, जे विस्थापित नाहीत, अशा खातेदार यांना जमीन दिली असून मूळ विस्थापितांना गेल्या ४० वर्षांपासून जमिनी मिळालेल्या नाहीत.
पुनर्वसन कार्यालयाकडून विविध कारणे देऊन जमिनी देण्यास टाळाटाळ होत आहे. जर जमिनी नसतील, तर जमिनीच्या मोबदल्यात एकरी ५० लाख व ४० वर्षांतील नुकसान भरपाई एकरी २० लाख याप्रमाणे असे एकूण ७० लाख रुपये द्यावेत. तसेच बनावट कागदपत्रे तयार करून बोगस जमिनी लाटल्या आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन पुनर्वसनमंत्री, विभागीय आयुक्त पुणे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन कार्यालय) यांना देण्यात आले. यावेळी सेबस डिसोझा, जॉन डिसोझा, कैथान फर्नांडिस, मारियान घोन्सालीस, रजेस परेरा, पावलु पिंटो उपस्थित होते.