आयआरबीच्या रस्त्यांचे नव्याने होणार मोजमाप

By Admin | Updated: February 26, 2015 00:53 IST2015-02-26T00:49:33+5:302015-02-26T00:53:15+5:30

मुंबईत निर्णय : पुढील आठवड्यात उपसमितीची बैठक

IRB roadways will be the new measurement measure | आयआरबीच्या रस्त्यांचे नव्याने होणार मोजमाप

आयआरबीच्या रस्त्यांचे नव्याने होणार मोजमाप

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील प्रत्येक कामाचा दर्जा तपासून, इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने नव्याने मोजमापे घेण्याचा निर्णय संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखालील त्रयस्थ मूल्यांकन समितीच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शहर अभियंता तथा समिती सदस्य नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. पुढील आठवड्यात समितीची पुन्हा बैठक होणार आहे.संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प खर्च ठरविण्यासाठी नेमलेल्या त्रयस्थ तज्ज्ञ उपसमितीची पहिली बैठक मुंबईत झाली. दुपारी तीन ते साडेपाच वाजेपर्यंत चालेल्या या बैठकीत प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीत एमएसआरडीसी व महापालिका यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी व कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासून अहवाल सादर करण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे मत तज्ज्ञांनी चर्चेअंती व्यक्त केले. प्रकल्पाचा नेमका खर्च कशा पद्धतीने ठरवावा, याबाबत प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून नव्याने मोजमाप घेण्याचे ठरले. येत्या पंधरा दिवसांत समिती सदस्य प्रकल्पाचा प्रत्यक्ष दौरा करणार आहे.
जो प्रकल्प पूर्ण झाला आहे, त्याची प्रत्यक्षात किती उपयोगीता आहे हे तपासण्याची मागणी महापालिकेतर्फे सरनोबत यांनी केली. गटर्स झाल्या आहेत, मात्र पाणी जात नाही. विजेचे दिवे बसले मात्र, उजेड पडत नाही. रस्ते झाले तरी त्याखाली युटिलिटी पाईप्स अडकल्या आहेत. या सर्वांचा विचार करून जुन्या सर्वेक्षणाचा आधार न घेता नव्याने प्रकल्पाचा लेखाजोखाची मागणी सरनोबत व कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक वास्तुविशारद राजेंद्र सावंत यांनी केली. यानुसार आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष मोजमापास सुरुवात होणार आहे. बैठकीसाठी समिती सदस्य वास्तुविशारद श्री. रामचंदानी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ओहोळ व साहाय्यक कार्यकारी संचालक प्रकाश खेमचंदानी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

प्रकल्पाचा नेमका खर्च पुढे येणे गरजेचे आहे. पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा आधार न घेता नव्याने सर्वांसमक्ष सर्वेक्षण करण्याचे ठरले आहे. समितीची पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होईल. त्यावेळी प्रकल्प भेटीची तारीख निश्चित केली जाईल.
- नेत्रदीप सरनोबत, समिती सदस्य

Web Title: IRB roadways will be the new measurement measure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.