मराठा राष्ट्रीय अधिवेशनाचे मावळ्यांनी दिले निमंत्रण

By Admin | Updated: August 1, 2014 00:35 IST2014-08-01T00:09:28+5:302014-08-01T00:35:17+5:30

महाद्वार रोडवर या अनोख्या प्रचाराची चर्चा

Invitation of Maratha National Convention Mavali | मराठा राष्ट्रीय अधिवेशनाचे मावळ्यांनी दिले निमंत्रण

मराठा राष्ट्रीय अधिवेशनाचे मावळ्यांनी दिले निमंत्रण

कोल्हापूर : वेळ सायंकाळी सहाची...शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर मावळ्यांच्या वेषातील चार कार्यकर्ते अचानक घोड्यावरून आले...त्यावर लोकांच्या नजरा खिळल्या...याबद्दल लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली....जवळ गेल्यावर या मावळ्यांकडून निमंत्रण पत्रिकाच हातात मिळाली. ती होती रविवारी (दि. ३) कोल्हापुरात होणाऱ्या मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची. उपस्थितांना मात्र, या अनोख्या निमंत्रणाचा सुखद धक्काच बसला....महाद्वार रोडवर कार्यकर्त्यांनी केलेल्या या अनोख्या प्रचाराची आज, गुरुवारी चर्चा चांगलीच रंगली. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ३ आॅगस्टला कोल्हापुरात राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती होण्यासाठी आज, गुरुवारी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहरात प्रचार मोहीम राबविली. सायंकाळी सहाच्या सुमारास बिनखांबी गणेश मंदिर येथून या मोहिमेला सुरुवात झाली. पारपंरिक मावळ्यांच्या वेशातील कार्यकर्र्ते ते ही घोड्यावरून आल्याने लोकांच्या नजरा याकडे वेधल्या; परंतु काही क्षणांतच लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले. या पारंपरिक वेषातील मावळयांनी प्रत्येकाच्या हातात पत्रिका देत अधिवेशनाचे निमंत्रण दिले. हे मावळे व त्यांचा लवाजमा गजबजलेल्या महाद्वार रोडवरून पापाची तिकटी, महापालिका, छत्रपती शिवाजी चौक, भवानी मंडप, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, बजापराव माने तालीम या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना हे निमंत्रण दिले.
भर पावसात या मावळ्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा दिसत होता. मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयात मोहिमेचा समारोप झाला. यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष संदीप पाटील, अवधूत पाटील, उत्तम जाधव, प्रकाश पाटील, मनोज नरके, दीपक मुळीक, महादेव पाटील, नीलेश साळोखे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Invitation of Maratha National Convention Mavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.