पोलिसांना ३६ लाखांचा तपास निधी
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T00:05:35+5:302015-07-25T01:13:31+5:30
गृहखात्याची मंजुरी : कर्नाटक पोलिसांच्या धर्तीवर प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, इतर खर्च मिळणार

पोलिसांना ३६ लाखांचा तपास निधी
कोल्हापूर : गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना बाहेरगावी, परराज्यांत जावे लागते. अशावेळी येणारा खर्च ते स्वत:च करत असतात. त्याची गृहखात्याने गांभीर्याने दखल घेत कर्नाटक पोलिसांच्या धर्तीवर प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, सर्वसाधारण खर्चासाठी कोल्हापूर पोलिसांना सुमारे ३६ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी येणारा खर्च आता पोलिसांना दिला जाणार आहे. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी परदेशात पळून गेल्यास त्याच्या शोधासाठी ‘अत्यावश्यक’ म्हणून विमान सेवेचाही पोलिसांना वापर करता येणार आहे.
खून, अपहरण, दरोडा, फसवणूक, बलात्कार, आदी गंभीर गुन्ह्यांतील आरोपी बाहेरगावी किंवा परराज्यांत पळून जातात. त्यांच्या शोधासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जावे लागते. गुन्ह्यांच्या तपासासाठी विविध कारणांसाठी जो खर्च होतो, तो संबंधित तपासी अधिकारी स्वत:च करतात. त्यांना शासकीय अनुदानातून कुठलाही परतावा मिळत नाही. स्वत:च तपासासाठी खर्च करावा लागत असल्याने एखाद्या प्रकरणाचा तपास खोलपर्यंत होऊ शकत नव्हता. परराज्यांत गुन्हेगारांच्या तपासासाठी जायचे झाले तर पाच ते सहाजणांची टीम, वाहनांचा खर्च आवाक्याबाहेर जात असे. अशावेळी पोलिसांना कोणाकडून मदत किंवा अवैध व्यावसायिकांकडून नाईलाजास्तव पैसे घेण्याची वेळ येत असे.
दरम्यान, पोलीस ठाणेनिहाय जर तपासणी अधिकाऱ्यास निधी मंजूर केल्यास त्यांचा तपासादरम्यान झालेला खर्चाचे देयक सादर करून त्याचा परतावा त्यांना मिळत जाईल. यासाठी तपास अनुदान मंजूर करण्याची मागणी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने गृहखात्याकडे करण्यात आली होती. दरम्यान, अंतर्गत सुरक्षेबाबत नवी दिल्ली येथे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तपासी अधिकारी यांना पोलीस ठाणे किंवा घटक पातळीवर गुन्हे तपासादरम्यान येणाऱ्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी कार्यवाही करावी, असे सुचविले होते. त्यानुसार २०१३-१४ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपासकामासाठी सुमारे १५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले; परंतु कोल्हापूर पोलिसांना हे अनुदान प्राप्त झाले नव्हते. २०१५-१६ या वर्षासाठी मात्र पोलीस दलास ३६ लाखांचा तपास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील आतापर्यंत आठ लाख रुपये तपासकामासाठी खर्च झाले आहेत. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी परदेशात पळून गेला, असेल तर त्याच्या शोधासाठी ‘अत्यावश्यक’ म्हणून विमानसेवेचाही पोलिसांना वापर करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिसाला स्वत:चा पासपोर्ट काढण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच तपासकामासाठी बाहेरगावी गेल्यानंतर नाष्टा, जेवण, राहणे व अन्य कामांसाठी पोलिसांना खर्च करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना हा तपास निधी वाटप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
खबऱ्यांनाही मिळणार अनुदान
गेल्या अनेक वर्षांपासून खबऱ्यांचे जाळे क्षीण होत चालले आहे. सध्या पोलीस खबऱ्यांचा फुकट वापर करत असल्याने खबऱ्यांनी त्यांची साथ सोडली आहे. गुप्तवार्ता संकलित करण्यासाठी पोलिसांना खबऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे खबऱ्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पोलिसांकडून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पुन्हा हे खबऱ्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी तपासनिधीतील काही रक्कम खबऱ्यांसाठी वापरणार आहेत.