मतदारांना पैशांचे वाटप प्रकरणाचा तपास कसून

By Admin | Updated: October 16, 2014 22:52 IST2014-10-16T22:34:21+5:302014-10-16T22:52:11+5:30

सतेज पाटील-महाडिक वाद : परस्परविरोधी फिर्यादी

Investigate the money allocation of money to voters | मतदारांना पैशांचे वाटप प्रकरणाचा तपास कसून

मतदारांना पैशांचे वाटप प्रकरणाचा तपास कसून

कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहोचला आहे. मतदारांना पैशांचे वाटप केल्याच्या संशयावरून माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे; तर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून माझ्यासह कुटुंबास मारहाण केल्याची तक्रार वळंजू यांनी राजारामपुरी पोलिसांत दिली आहे. या दोन्ही प्रकरणांचा अत्यंत बारकाईने तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर, दत्त कॉलनी, शिरत मोहल्ला येथे आमदार महाडिकयांचे खंदे कार्यकर्ते माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या ‘लक्ष्मी आनंद’ बंगल्यातून पैसे घेऊन ते मतदारांना वाटप करीत असल्याच्या संशयावरून निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख भोसले यांनी वळंजू यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. नदाफ करीत आहेत. नदाफ यांनी आज, गुरुवारी वळंजू यांच्या घरासमोरचा पंचनामा केला. त्यानंतर निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख भोसले व कॅमेरामन यांचे जाबजबाब घेतले.
दरम्यान, वळंजू यांनी माजी गृहराज्यमंत्री पाटील यांनी घरात घुसून मारहाण केल्याची लेखी तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न करता तक्रार अर्जानुसार तपास सुरू केला आहे. वळंजू यांना मारहाणीचा प्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले. वळंजू यांचे दोन कार्यकर्ते संशयित प्रवीण व्हटकर व नितीन पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे आज दिवसभर कसून चौकशी सुरू होती. या दोन्हीही प्रकरणांचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधितांना अटक केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Investigate the money allocation of money to voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.