तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 00:27 IST2016-03-18T00:23:18+5:302016-03-18T00:27:14+5:30

वारणानगर चोरी प्रकरण : मैनुद्दीन कोडोली पोलिसांच्या ताब्यात; ‘प्राप्तिकर’कडूनही चौकशी

Investigate local crime investigations | तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे

तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे

कोल्हापूर/सांगली/वारणानगर : वारणानगर येथे वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीत सापडलेली रोकड आणि याच कॉलनीत झालेल्या चोरीचा तपास गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला. दरम्यान, या कॉलनीतून ३ कोटींची रक्कम लांबविणाऱ्या मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन याला न्यायालयाच्या आदेशानुसार सांगली पोलिसांनी कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या संपूर्ण रकमेची चौकशी प्राप्तिकर खात्याने सुरू केली आहे.
मार्च एडिंग असल्यामुळे प्राप्तिकर कार्यालयात लगबग सुरू आहे. या कार्यालयाला रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पत्र मिळाले आहे. मात्र, ही रक्कम अद्याप ताब्यात घेतली नसल्याचे प्राप्तिकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकारची चौकशी सुरू असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. पैसे ताब्यात घ्यावेत, यासाठी बुधवारी सायंकाळीच कोडोली पोलीसांनी कोल्हापुरातील प्राप्तिकर कार्यालयाला पत्र पाठविले होते.
मैनुद्दीन मुल्लाने सांगली पोलिसांना हे पैसे वारणेच्या शिक्षक कॉलनीमधून रेहान अन्सारी (बिहार) या साथीदारासमवेत चोरी केल्याचे तपासात सांगितले होते. त्यानुसार बुधवारी कोडोली व सांगली पोलिसांनी वारणानगर येथे छापा टाकला असता आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये सापडले.
मैनुद्दीन मुल्ला याचा ताबा घेण्यासाठी कोडोली पोलिस सांगलीला रवाना झाले. दुपारी कोडोली पोलिसांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित मैनुद्दीन मुल्ला याला सांगली पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यानंतर सांगलीहून रात्री उशिरा कोडोली पोलिसांनी ठाण्यात आणले. त्याला आज, शुक्रवारी त्याला घटनास्थळी चौकशीसाठी नेण्याची शक्यता आहे. तसेच पन्हाळा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नं. ५ मधून एक कोटी ३१ लाख रुपये बुधवारी कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले. मिरजेतील बेथेलहेमनगरामध्ये मुल्लाच्या मेहुणीच्या घरात सापडलेली तीन कोटींची रोकडही याच इमारतीतून चोरीस गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सुमारे चार कोटी ३८ लाख ९२ हजार रुपये कोटींची बेहिशेबी रोकड वारणानगर येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
हँडल तुटले, रोकड वाचली...
मैनुद्दीन मुल्ला याने सहकारी रेहान अन्सारी (रा. बिहार) याच्यासह शिक्षक कॉलनीतील बिल्डिंग नं. ५ मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी तिजोरीचे कुलूप कटावणीने मोडून वरच्या कप्प्यातील तीन कोटी सात लाख ६३ हजारांची रोकड ताब्यात घेतली. तिजोरीतील खालच्या कप्प्यात आणखी पैसे आहेत माहिती असल्याने तोही कप्पा मैनुद्दीनने उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्या कप्प्याच्या दरवाजाचे हँडल तुटल्याने तो कप्पा उघडलाच
नाही, त्यामुळे मिळालेल्या रोकडवर समाधान मानून त्याने तेथून पलायन केले.
त्यामुळे खालच्या कप्प्यातील १ कोटी ३१ लाखांची रोकड सुरक्षित राहिली. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी तो कप्पा कटावणीने उघडून रोकड ताब्यात घेतली.


पोलिस दारांत आल्यावर चोरीची फिर्याद
वारणानगर (ता. पन्हाळा) : येथील वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांच्या गाडीवर मैनुद्दिन मुल्ला हा कांही दिवसांपूर्वी चालक होता. त्याच मैनुद्दिनकडे तीन कोटी रुपये सापडले. त्याने आपण ठेवलेल्या पैशाची तर चोरी केली नाही ना याची खात्री करून त्याचदिवशी पोलिसांत चोरीची फिर्याद देण्याची तत्परता बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांनी का दाखवली नाही हाच या प्रकरणातील संशयाचा मुख्य धागा म्हणून पुढे येत आहे. मिरज पोलिसांनी पकडलेल्या तीन कोटी रुपयांच्या चौकशीसाठी सांगलीचे पोलिस मंगळवारी वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत येवून गेल्यानंतर सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत तक्रार दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.


राजकीय दबाव टाळण्यासाठी तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे !
सांगलीत न्यायालयाने मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन या संशयित आरोपीला गुरुवारी न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याला कोल्हापूरच्या कोडोली पोलिसांनी पुढील तपासासाठी आपल्या ताब्यात घेऊन अटक दाखविली. त्याला सायंकाळी सात वाजता कोल्हापुरात शाहूवाडी-पन्हाळा पोलीस उपाधीक्षक कार्यालयात आणण्यात आले; पण या गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या आदेशानुसार हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. कोडोली पोलिसांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता विचारात घेवून हा तपास कोल्हापूरकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते.

गंजलेली तिजोरी
शिक्षक कॉलनीतील बिल्डिंग नंबर पाचमधील पहिल्या मजल्यावरील ज्या खोलीत हे घबाड सापडले, ती खोली अडगळीची असून, त्या खोलीत साहित्य विखुरलेले होते. रोकड असलेली तिजोरीही पुरती गंजलेली होती.


मैनुद्दिनचा साथीदार पसार
मूळ जाखले (ता. पन्हाळा) येथील असलेला संशयित मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दिन मुल्ला हा काही वर्षांपासून मिरज येथे वास्तव्यास आहे. वारणानगरमधील चोरी त्याने साथीदार संशयित बिहारमधील रेहान अन्सारी याच्या मदतीने केली पण, तो सध्या पसार असल्याचे कोडोली पोलिसांनी सांगितले.


रक्कम कोठून आणली याची चौकशी होणार
वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांची प्राप्तिकर विभागामार्फत चौकशी होणार आहे. एवढे पैसे त्यांनी आणले कोठून याची शहानिशा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Investigate local crime investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.