जिल्हा परिषदेच्या चार पदाधिकाऱ्यांचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:01+5:302021-07-14T04:29:01+5:30
सभापती, बांधकाम आणि आरोग्य समिती तळाशीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव गुरुजी यांच्या सूनबाई असलेल्या वंदना जाधव यांचे शिक्षण ...

जिल्हा परिषदेच्या चार पदाधिकाऱ्यांचा परिचय
सभापती, बांधकाम आणि आरोग्य समिती
तळाशीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव गुरुजी यांच्या सूनबाई असलेल्या वंदना जाधव यांचे शिक्षण एम.ए.बी.एड्. इतके झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील चरण हे त्यांचे माहेर असून कसबा वाळवे मतदारसंघातून त्या निवडून आल्या. २००७ ते २००९ या काळात त्यांनी राधानगरीच्या सभापती म्हणून काम पाहिले. गोकुळच्या निवडणुकीत आबिटकर यांनी विरोधी गटाला पाठिंबा देताना जाधव यांना पद देण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी दिला होता.
रसिका अमर पाटील
सभापती, शिक्षण व अर्थ समिती
ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांच्या पुतण्याची पत्नी म्हणजेच सूनबाई असलेल्या रसिका पाटील यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले आहे. शे. का. पक्षाचे कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे समाजकार्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसल्याने शिंगणापूर मतदारसंघातून त्या अपक्ष म्हणून ईर्षेने निवडून आल्या. पती अमर पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे खंदे समर्थक असून पदाधिकारी बदलामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
- शिवानी विजयसिंह भोसले
सभापती, महिला आणि बालकल्याण समिती
बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या शिवानी भोसले यांचे माहेर बेळगाव. नानीबाई चिखली मतदारसंघातून त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे.
कोमल सरदार मिसाळ
सभापती, समाजकल्याण समिती
करवीर तालुक्यातील वडणगेच्या असलेल्या मिसाळ यांचे वळिवडे हे माहेर. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कोमल यांचे पती सरदार हे शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. सरदार यांनी करवीर पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक असलेले मिसाळ हे समाजकारणासाठी पूर्णवेळ देतात. त्याचा फायदा कोमल यांना झाला.