शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख विद्युत विश्वाची’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:57+5:302021-07-12T04:15:57+5:30
कोल्हापूर : महावितरणच्या कोल्हापूर मंडळातर्फे सांगली येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकरिता वेबिनारद्वारे ‘ओळख विद्युत विश्वाची’ या प्रशिक्षण ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख विद्युत विश्वाची’
कोल्हापूर : महावितरणच्या कोल्हापूर मंडळातर्फे सांगली येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकरिता वेबिनारद्वारे ‘ओळख विद्युत विश्वाची’ या प्रशिक्षण उपक्रमाचा प्रारंभ झाला. रविवारी पहिले प्रशिक्षण सत्र संपन्न झाले. प्रारंभिक सत्रात महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नववी व दहावीच्या वर्गात शिकणारे ४० पाल्य सहभागी झाले होते.
वीज म्हणजे केवळ प्रकाश नव्हे तर ती शिक्षण, मनोरंजन, आरोग्य या गरजांच्या पूर्तीकरिता महत्त्वाचा घटक बनली आहे. जीवनावश्यक विजेबद्दलची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने ‘ओळख विद्युत विश्वाची’ या विषयावर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. विजेच्या निर्मिती स्रोतानुसार जल, सौर, पवन, औष्णिक व आण्विक ऊर्जा याबाबत माहिती, वीज निर्मिती ठिकाणापासून आपल्या घरापर्यंत मैलांचा प्रवास करत ती कशी पोहोचते? विद्युत यंत्रणा आणि तिची रचना व कार्य? विद्युत यंत्रणेत निर्माण होणारे तांत्रिक दोष, विद्युत सुरक्षा आदी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचेही निरसन करण्यात आले.
कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. सांगली प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरी ताम्हणकर यांनी विषयांची मांडणी केली. या उपक्रमाचे पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी कौतुक केले.
सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता शिल्पा जोशी यांनी केले. या वेबिनारच्या आयोजनासाठी उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांनी परिश्रम घेतले.