धाकधूक, निकाल आणि जल्लोष..
By Admin | Updated: May 28, 2015 00:56 IST2015-05-28T00:11:43+5:302015-05-28T00:56:55+5:30
बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर : विवेकानंद, राजाराम, न्यू कॉलेजचे घवघवीत यश

धाकधूक, निकाल आणि जल्लोष..
कोल्हापूर : बारावीचा निकाल दुपारी एक वाजता ‘आॅनलाईन’ जाहीर झाला असला तरी निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांसह पालकांना धाकधूक लागून होती. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शहरातील नेट कॅफे तसेच विविध खासगी, शासकीय कार्यालयांसह मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती.
एकाच वेळेला अनेकजण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहत असल्याने संकेतस्थळ ‘हँग’ होत होते. अनेकांनी आपल्या अथवा मित्रमैत्रिणींंच्या ‘स्मार्टफोन’वर घरातच निकाल जाणून घेतला. त्यानंतर दुपारनंतर अनेकजण नातेवाईक, मित्रमैत्रिणींना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून निकालाची गोड बातमी देत होते. यावेळी शहारातील बेकरी, मिठाईच्या दुकानांत पेढे खरेदी करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती.
अनेकजण संकेतस्थळावरून निकालाची प्रत ‘डाउनलोड’ करून ‘व्हॉट्स अॅप’द्वारे एकमेकांना पाहण्यासाठी दिवसभर टाकत होते; तर काही विद्यार्थी महाविद्यालयात भेट देऊन संबंधित शिक्षकांना आपल्या निकालाची बातमी सांगताना दिसत होते. सायंकाळी शहरातील अनेक मंदिरांत दर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती.