‘राष्ट्रवादी’च्या गुरुवारी मुलाखती
By Admin | Updated: August 30, 2015 00:26 IST2015-08-30T00:26:46+5:302015-08-30T00:26:46+5:30
दोन्ही आघाड्यांच्या बैठका : भाजप-ताराराणीचा हायटेक प्रचार

‘राष्ट्रवादी’च्या गुरुवारी मुलाखती
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच आघाड्या, पक्षांकडे रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या वतीने गुरुवारी व शुक्रवारी (दि. ३ व ४ सप्टेंबर) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत शनिवारी रात्री आमदार हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठकीत निवडणुकीचा आढावा घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
निवडणूक दोन महिन्यांवर असली तरी अगोदरच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने या निवडणुकीने चांगलाच रंग भरला आहे. पक्ष-आघाडींकडे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, ‘जनसुराज्य’चे प्रा. जयंत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, भैया माने, उत्तम कोराणे यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली.
प्रभावी नगरसेवकांचा प्राधान्याने विचार
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्या तरी गेल्या पाच वर्षांत प्रभागात प्रभावी काम केलेल्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांच्या प्रभागात आरक्षण जाहीर झाले आहे, त्यांच्या कुटुंबीयांचाही विचार केला जाणार असल्याचे समजते.
‘भाजप-ताराराणी’चा १५ दिवस प्रचारावर भर
भाजप-ताराराणी आघाडीने दि. १५ सप्टेंबरपर्यत फक्त विविध मार्गांनी प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत घेतला आहे. ३१ आॅगस्ट रोजी ‘प्रतिसंवाद,’ तर त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मतदारांना सोशल मिडीया व निवेदन वाटप यांद्वारे प्रचार यंत्रणा राबविणार असल्याचे शनिवारी झालेल्या बैठकीत ठरले. याशिवाय दोन दिवसांत आघाडीची होर्डिंग उभारण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले.