हातकणंगले तालुक्यात सरपंचपदासाठी तीव्र चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:35+5:302021-02-05T07:00:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : हातकणंगले तालुक्यात सर्वसाधारण गटाच्या सरपंच पदासाठी अनेक मातब्बरांनी मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वार्थाने ...

Intense demand for Sarpanch post in Hatkanangle taluka | हातकणंगले तालुक्यात सरपंचपदासाठी तीव्र चुरस

हातकणंगले तालुक्यात सरपंचपदासाठी तीव्र चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : हातकणंगले तालुक्यात सर्वसाधारण गटाच्या सरपंच पदासाठी अनेक मातब्बरांनी मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे सर्वार्थाने या लढाईला महत्त्व आले आहे. २१ पैकी सहा गावांत सरपंच पदाचे मैदान ९ तारखेला चांगलेच गाजणार असे चित्र निर्माण झाले आहे. १२ ठिकाणी महिलांची सरपंच पदी वर्णी लागणार आहे. पुरुषांच्या दुप्पट संख्येने महिला सरपंच होणार आहेत.

तालुक्यात तासगाव हे बिनविरोध झालेले गाव वगळता इतर ठिकाणी चुरशीची निवडणूक झाली. बहुतांश ठिकाणी सत्तांतर झाले. महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळाले. त्यानंतर झालेल्या सरपंच निवड आरक्षणात अनेक ठिकाणी आश्चर्यजनक आरक्षण आले. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाले. किमान उपसरपंच पद तरी द्या, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. जंगमवाडी, माणगाव, लाटवडे, तिळवणी, खोची, मनपाडळे याठिकाणी सर्वसाधारण गटाचा सरपंच पदावर विराजमान होणार आहे. यापैकी तिळवणी, खोची येथे सत्तेचे गणित सोडविताना चांगलाच तिढा निर्माण होत आहे. कारण येथे तिरंगी लढती होऊन स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालेले नाही. त्यामुळे कोणत्यातरी आघाड्याचा टेकू घेऊनच सत्तेचं सूत्र सोडवण्याचा प्रयत्न सुरू असताना दिसत आहे. माणगाव, लाटवडे, मनपाडळे येथे विजयी झालेल्या पॅनलला बहुमतचा कौल मतदारांनी दिलेला आहे. त्यामुळे एकाच पॅनलमधील इच्छुकांना रोटेशनने संधी देण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. सर्वसाधारण स्त्री आरक्षण पडलेल्या ग्रामपंचायतींची संख्या सहा आहे. मिणचे, बिरदेववाडी, माणगांववाडी, वाठार तर्फ उदगाव, कुंभोज, पाडळी या गावांचा यामध्ये समावेश आहे. तीन ठिकाणी सत्तांतर होऊन एकतर्फी विजय मिळविला असल्याने येथेसुद्धा कोणाची निवड करायची यासंदर्भात नेत्यांना स्पष्ट, जाहीर बोलणे जिकिरीचे होऊन बसले आहे. शेवटच्या दिवशीच नावे समोर येतील अशी स्थिती आहे. अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी तीन ठिकाणी, तर नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गासाठी तीन ठिकाणी सरपंच पदाची संधी आहे. तालुक्यात पुन्हा एकदा निवडीच्या निमित्ताने चांगलीच रंगत येताना दिसत आहे.

वाठारमध्ये घडामोडींना वेग

वाठार तर्फ वडगाव येथे सरपंचपद अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव असून देखील येथे चुरस वाढली आहे. जय हनुमान आघाडीत वाठार विकास आघाडीच्या एकमेव सदस्याने प्रवेश केला असून त्यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधी संत गोरोबाकाका आघाडीने देखील सरपंचपदासाठी फिल्डिंग लावली आहे. काठावरचे बहुमत असल्याने येथे सरपंचपदाबाबत अनेक घडामोडी घडत आहेत.

Web Title: Intense demand for Sarpanch post in Hatkanangle taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.