लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेने गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कुंडांची व्यवस्था केली आहे. यातून पालिका गणेशमूर्ती जमा करून घेणार असून, यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. तसेच दान घेतलेल्या मूर्ती इतर कुंभार बांधवांना दिल्यास आंदोलनाचा इशारा मूर्तिकार संघटनेने दिला.
हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्यावर्षी कुंडांत विसर्जित केलेल्या मूर्तींची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आणला. पुन्हा असे घडू नये, यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी नगराध्यक्षा अलका स्वामी यांची भेट घेतली. यावेळी हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ नये, याची खबरदारी घ्यावी; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी पंढरीनाथ ठाणेकर, किशोर मोदी, संतोष हत्तीकर, प्रवीण सामंत, बाळासाहेब ओझा, दत्ता पाटील, मुकेश दायमा उपस्थित होते.
दरम्यान, कुंभार समाज व इचलकरंजी शहर मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दान स्वरूपात घेतलेल्या मूर्ती इतर कुंभारांना स्वाधीन करू नयेत अथवा त्यांना घेण्यास प्रवृत्त करू नये, अशी मागणी केली. यावेळी उत्तम कुंभार, बाळू कुंभार, संजय कुंभार, राहुल आरेकर उपस्थित होते.