कार्यकर्त्यांची घालमेल.. उत्कंठा शिगेला..!
By Admin | Updated: December 9, 2015 01:54 IST2015-12-09T01:50:18+5:302015-12-09T01:54:01+5:30
विधानपरिषद निवडणूक : उमेदवारीचा पक्षश्रेष्ठींपुढे पेच; आजच होणार घोषणा

कार्यकर्त्यांची घालमेल.. उत्कंठा शिगेला..!
कोल्हापूर : विधानपरिषदेची उमेदवारी द्यायची कोणाला, याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला असून मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्ली दरबारी खलबते सुरू होती. सतेज पाटील, पी. एन. पाटील की आमदार महादेवराव महाडिक या नावांवर शेवटपर्यंत चर्चा सुरू राहिली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारीची घोषणा झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड घालमेल झाली.
उमेदवारीची घोषणा आज, बुधवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. अर्ज दाखल करण्याचा आज, बुधवारी शेवटचा दिवस आहे. उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात शेवटपर्यंत चढाओढ सुरू राहिली. सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांनी आतापर्यंतची आपली राजकीय ताकद पणाला लावल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला. मंगळवारी दुपारीपर्यंत उमेदवारी जाहीर होईल, असे जाहीरकेले होते; पण शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींनी गोपनियता पाळली. काँग्रेस पक्षाच्यावतीने मंगळवारी नागपूर विधिमंडळावर मोर्चा होता. सतेज पाटील व प्रकाश आवाडे हे नागपुरात तर पी. एन. पाटील व आमदार महाडिक कोल्हापुरात होते. नागपूर येथे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर पाटील व आवाडे यांनी चर्चा केली. तिथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोणताच सिग्नल दिला नाही. संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींच्या सावध हालचाली सुरू होत्या. शेवटपर्यंत उमेदवारी ताणल्याने इच्छुक ‘गॅस’वर होते. त्यांना कार्यकर्त्यांनी ‘साहेब उमेदवारीचे काय झाले..’ म्हणून अक्षरक्ष: भंडावून सोडले.
आमदार महाडिक हे काँग्रेसचे उमेदवार असतील तर भाजप उमेदवार उभा करणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आठ दिवसांपूर्वी जाहीर केले होेते. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसश्रेष्ठींमध्ये जोरदार चर्चा झाली. महाडिक यांना उमेदवारी दिली तर कोल्हापूरची जागा बिनविरोध होऊ शकते, असा संदेश श्रेष्ठींपर्यंत गेल्याने सतेज पाटील की महाडिक यांच्यात रस्सीखेच सुरु राहिली. या दोघांकडेही निवडून येण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाला कुणाला उमेदवारी दिली तर दुसरा बंडखोरी करणार हे स्पष्ट आहे. परिणामी ही जागा अडचणीत येवू शकते म्हणून या दोघांनाही बाजूला ठेवून जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांना त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ म्हणून उमेदवारीसाठी विचार झाला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू त्यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी विरोध करेल अशीही भिती व्यक्त झाली.
सकाळी ‘पी.एन.,’ रात्री ‘सतेज’
काँग्रेस पक्षाने उमेदवारीबाबत कमालीची गोपनीयता पाळल्याने कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे सातत्याने विचारपूस होत राहिली. सोशल मीडियावरील मेसेजमुळे गोंधळ उडाला होता. सोशल मीडियावर सकाळी ‘पी. एन. पाटील यांना उमेदवारी जाहीर’ झाल्याचे मेसेज फिरत होते. दुपारी महाडिक यांचे नावे पुढे होते तर रात्री ‘सतेज पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याचे मेसेज फिरू लागले.
‘ए’ ‘बी’ फॉर्म कोल्हापुरात
उमेदवारी अर्जासोबत काँग्रेस पक्षाचे ‘ए’ ‘बी’ फॉर्म मंगळवारी दुपारीच प्रदेश काँग्रेसच्या विश्वासू सहकाऱ्याकडून कोल्हापुरात आले आहेत. उमेदवारीची घोषणा दिल्लीत होणार असल्याने कोरे फॉर्म जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडे आले आहेत. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यावर नाव टाकून बुधवारी संबंधित उमेदवाराकडे दिले जाणार आहेत. अर्जांची छाननी गुरुवारपर्यंत आहे. त्यामुळे त्यावेळीही ए बी फॉर्म सादर केला तरी चालू शकते.