तुकडीऐवजी विद्यार्थी वाढविणार
By Admin | Updated: July 9, 2015 23:58 IST2015-07-09T23:58:39+5:302015-07-09T23:58:39+5:30
शासनाचा निर्णय : प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिलासा; प्रस्तावाचा आज अखेरचा दिवस

तुकडीऐवजी विद्यार्थी वाढविणार
कोल्हापूर : पदवीच्या प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांप्रश्नी पहिल्यांदा तुकडी वाढवून देण्याचा विचार राज्य शासनाने केला होता. मात्र, आता तुकडी नाही, विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत उच्चशिक्षण विभागाने या आनुषंगाने निर्णय घेतला. बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्याने यावर्षी प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि नवीन महाविद्यालय, तुकडी, विषयांना मान्यता न देण्याचा २९ एप्रिल २०१५ रोजी मंजूर झालेला शासन आदेश, अशा बाबींमुळे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा गुंता यावर्षीही कायम राहिला आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.५४ टक्के लागला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक लाख चार हजार ९०६ होती, शिवाय सुमारे २५ हजार अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी विभागाच्या निकालाची टक्केवारी ०.५९ ने वाढली असून, एक लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाढलेली संख्या पाहता यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुमारे २० हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकड्यांना मान्यता देणे आवश्यक असल्याचे प्रयत्न प्राचार्य, संस्थाचालकांकडून सुरू होते.
विद्यार्थी हित लक्षात घेऊन गेल्या महिन्यापासून त्यांनी शिवाजी विद्यापीठ, उच्चशिक्षण विभागाकडे तुकड्या वाढवून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तुकडी वाढवून देण्याचा विचार शासनाने केला होता. त्यावर महाविद्यालयांकडून प्रस्ताव घेऊन ते उच्चशिक्षण विभागाकडे पाठवून द्यावेत, अशी सूचना विद्यापीठांना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर होत असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत तुकडी नाही, तर सध्या असलेल्या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात गेल्यावर्षी प्रमाणेच विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार विद्यार्थी संख्या वाढवून मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)
नव्या निर्णयाचा आधार
अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकडी मागण्यासाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे येत आहेत. प्रस्ताव देण्याची अंतिम मुदत आज, शुक्रवारपर्यंत आहे. दाखल झालेल्या प्रस्तावानंतर एकूण किती विद्यार्थी अतिरिक्त होणार, हे समजेल. नव्या निर्णयानुसार विद्यापीठ कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवून दिली जाईल, अशी माहिती ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी दिली.